Saturday, May 4, 2024
HomeUncategorizedशूर सेनानी राणी अबक्का!

शूर सेनानी राणी अबक्का!

भारताच्या इतिहासात अनेक कर्तृत्ववान महिला होऊन गेल्या. त्यांनी त्यांची कारकीर्द गाजवली. या सदरातून ओळख करून घेऊया भारतवर्षातील अशाच काही देदीप्यमान शलाकांची.

दक्षिण भारतात स्वातंत्र्यासंग्रामात स्वदेशी आंदोलनासाठी पुढाकार घेऊन लढणारी परंतु प्रसिद्धीपासून दूर असलेली पहिली महिला स्वातंत्र्यसेनानी म्हणून एक नाव आपल्यापुढे येते ते म्हणजे राणी अबक्का महादेवी! त्यांच्या नावाप्रमाणेच त्यांचे शौर्यसुद्धा दुर्लभ आणि अभूतपूर्व असे होते. राणी परकीय युरोपियनाविरुद्ध लढा देणारी पहिली भारतीय महिला होती. भारतावर प्रभुत्व स्थापन करण्याचा मानस ठेवणार्‍या पोर्तुगीज साम्राज्यविरुद्ध सक्षम लढा उभारून प्रभावीपणे युद्ध करणार्‍या राणी अबक्कादेवींचे साहस अवर्णनीय असे होते.

वास्को-द-गामापाठोपाठ असंख्य पोर्तुगीज जहाजांनी कालिकत बंदरात नांगर टाकला आणि सोने मिळवून देणार्‍या मसाल्याच्या व्यापाराची सुरुवात भारतात केली. 16 व्या शतकात गोवा, मंगळूर आणि तामिळनाडू या व्यापारी केंद्रांवर व्यापार करण्याबरोबरच पोर्तुगीज येथील समाजकारणात आणि राजकारणातही लुडबूड करू पाहत होते. त्यावेळी तुलुनाडू राज्याच्या गादीवर दिगंबर जैन पंथीय चौटा वंशातील राणी अबक्का राज्य करत होती. अबक्का राणीचा जन्म 1525 मध्ये झाला. आई तिरूमला राय यांच्यानंतर राणी अबक्का गादीवर आली. त्यावेळी तामिळनाडूमध्ये मातृसत्ताक पद्धत होती. चौटा वंशाचे सरदार हे खरे तर मूळ गुजरातमधील. युद्धजन्य कारणांमुळे त्यांना गुजरात म्हणजे सौराष्ट्रातून बाहेर पडायला लागले. दक्षिणेकडे येऊन या चौटा साम्राटांनी अनेक सुंदर इमारती बांधल्या. उल्लाल येथील सोमेश्वराचे मंदिर हे त्याचेच एक उत्तम उदाहरण आहे. चौटा घराण्यात महिलांना सम्राटपद मिळत असे. त्यानुसार राणी अबक्काने तुलुनाडू व त्याची उपराजधानी असलेल्या उल्लालवर राज्य केले.

- Advertisement -

राणी अबक्काचे व्यक्तिमत्त्व अतिशय आकर्षक होते. ती स्वतः शक्तिशाली होती. तिचा आपल्या राज्यकारभारावर वचक होता. ती प्रजेवर अतिशय प्रेम करत होती. सामान्य लोकांत मिसळणे तिला आवडायचे. त्यामुळे प्रजाजनात जाऊन लोकांच्या समस्यांचे निराकरण करण्याला ती प्राधान्य देई.राणी अबक्का लोकप्रिय राणी होती. ती तलवारबाजी, घोडेस्वारी, निशानेबाजी आणि राजकारणातही तज्ज्ञ होती. राणी जेव्हा सिंहासनावर बसली तेव्हा तिच्या सहासाची चर्चा सर्वदूर पसरली होती. राणी अबक्काचा विवाह मंगलोरचा राजा लक्ष्मप्पा बंगराज याच्याबरोबर झाला. राणीने दोन मुलींना जन्म दिला. परंतु तिचा हा विवाह फारकाळ टिकला नाही.

पोर्तुगीजांचा व्यापाराबरोबर आपल्या राज्यातील राजकारणात आणि समाजकारणातला वाढता हस्तक्षेप राणी अबक्काला पसंत नव्हता. ती वेळोवेळी त्यांना याबाबत विरोध करत होती. परंतु राजा लक्ष्मप्पा पोर्तुगीजांना सत्ता वाढवण्यास मदत करत होता. हे जेव्हा राणीच्या लक्षात आले तेव्हा ती लक्ष्मप्पाला सोडून मंगलूर येथून पुन्हा उल्लालला निघून आली. राणी निघून गेल्यामुळे लक्ष्मप्पाचा अहंकार दुखावला गेला. या गोष्टीचा बदला घेण्यासाठी पुढे तो उघडपणे पोर्तुगीजांना जाऊन मिळाला. पोर्तुगीजांनी 1510 मध्ये गोवा जिंकून घेतले होते. त्यापाठोपाठ त्यांनी मंगलोरही जिंकून घेतले.आता पोर्तुगीजांची नजर उल्लालवर होती. कारण उल्लाल त्यावेळची उत्तम दर्जाच्या मसाल्याच्या पदार्थांची मोठी बाजारपेठ होती. परंतु उल्लालवर वर्चस्व प्रस्थापित करणे पोर्तुगीजांसाठी सोपे नव्हते. पोर्तुगीजांनी जेव्हा उल्लालवर हल्ला केला तेव्हा राणीने त्यांना कडाडून प्रतिकार केला. तेव्हा पोर्तुगीजांना पळतीभुई थोडी झाली. राणी शास्त्रास्र युद्धात निपुण होती. ती युद्धामध्ये अग्निबाणाचा वापर प्रभावीपणे करणारी शूर योद्धा होती.तेलात भिजवलेल्या नारळाच्या पानापासून बनवलेला अग्निबाण त्यावेळी तयार केला जात असे. हे अग्निबाण फार लांबचा पल्ला गाठत असे. या अग्निबाणाचा उपयोग राणीने समुद्रामध्ये दूरवर असणार्‍या शत्रूंच्या जहाजांना टिपण्यासाठी केला.

जवळजवळ दहा वर्षे पोर्तुगीज उल्लाल घेण्यासाठी वेळोवेळी राणी अबक्कावर आक्रमण करत होते. परंतु त्यांना त्यात यश येत नव्हते. 1557 पर्यंत उल्लालवर पोर्तुगीजांनी चारवेळा आक्रमण केले. परंतु पोर्तुगीजांना या चारही वेळी माघार घ्यावी लागली. त्यामुळे पोर्तुगीजांनी कुटनीतीचा वापर करायचे ठरवले.राणीचा पती लक्ष्मप्पा तिच्यावर चिडून होताच. या गोष्टीचा फायदा घेऊन त्यांनी लक्ष्मप्पावर आपले जाळे टाकले. राणीवरच्या रागात त्याने पोर्तुगीजांना राणीच्या विरोधात गुप्त माहिती पुरवली. याच माहितीचा वापर करून पोर्तुगीज थेट अबक्काच्या राजदरबारात घुसले; परंतु राणी त्यावेळी त्यांना सापडली नाही. राणी आपल्याला घाबरून पळून गेली म्हणून पोर्तुगीजांना आनंद झाला. मात्र ती एका ठिकाणी दबा धरून बसली होती. रात्रीच्या वेळी राणी अबक्काने आपल्या निवडक 200 सैनिकांसह बेसावध असणार्‍या पोर्तुगीज सैन्यावर जोरदार हल्ला चढवला. या लढाईत पोर्तुगीजांचे बरेच सैनिक मारले गेले. सैन्याच्या प्रमुख जनरलला राणीने यमसदनास पाठवले. उरलेले सैनिक जीव मुठीत घेऊन पळून गेले.

1570 मध्ये अहमदनगरचा सुलतान आणि कालिकतचा झामोरिअन याच्याशी राणीने हातमिळवणी करून पोर्तुगीजांशी लढा दिला. राणीच्या रणनीतीने पोर्तुगीज त्रस्त झाले. त्यांनी राणीवर कर लादून दबाव आणण्याचा प्रयत्न केला, पण राणीने त्यांना भीक घातली नाही. राणीने पोर्तुगीजांवर हल्ला करत इंग्रजांच्या ताब्यातील मंगरूळचा किल्ला हस्तगत केला. त्याबरोबरच कर्नाटकातील कुंदपूर हे शहर ताब्यात घेतले. राणी अबक्का पोर्तुगीजांसाठी मोठी कठीण समस्या बनली होती. याचदरम्यान राणी अबक्काचा पती लक्ष्मप्पा याने पोर्तुगीजांना पुन्हा गुप्त माहिती दिली. पोर्तुगीज सेनेने पुन्हा उल्लालवर हल्ला चढवला. या युद्धामध्ये राणीच्या बाजूने लढणारा कालिकतचा जनरल झामोरियन हा पोर्तुगीजांच्या हातून मारला गेला. लक्ष्मप्पाच्या धोक्यामुळे राणी अबक्का या लढाईत हरली. राणीला पोर्तुगीजांनी कैद केले. कैदेत असतानाही राणीने पोर्तुगीजांविरुद्धचा विद्रोह कायम ठेवला. ती लढत राहिली. कैदेमध्ये असताना लढता-लढताच तिने शेवटचा श्वास घेतला.

राणी अबक्काच्या राज्यात सर्व धर्माचे लोक समानतेने राहत होते. तिच्या लोकप्रियतेमुळे आणि शौर्यामुळे तिला ‘अभया राणी’ असेही कवींनी म्हटले आहे. राणी अबक्का चौटचा हा स्वातंत्र्यलढा फक्त इतिहासापुरता मर्यादित नाही तर आजही महिला सशक्तिकरणाकरता तिचे उदाहरण महिलांपुढे आदर्श आहे. ती सर्वधर्मसमभाव मांडणारी राणी होती. राणी अबक्काचे हे प्रभावशाली व्यक्तिमत्त्व, तिची गौरवगाथा पुढील पिढ्यांना प्रेरणादायी व्हावी यासाठी आजही कर्नाटकात ‘यक्षगान’ या पारंपरिक कर्नाटकी शैलीद्वारे प्रस्तुत केली जाते. याबरोबरच तेथील ‘कोला’ या स्थानीय नृत्यशैलीतूनही राणीची प्रजाहित दक्षता आणि न्यायप्रियता दाखवली जाते.

मंगलोर येथे राणी अबक्काच्या स्मरणार्थ आजही ‘वीर राणी अबक्का उत्सव’ होतो. त्यात विशेष कामगिरी करणार्‍या महिलांना वीर राणी अबक्का पुरस्काराने सन्मानित केले जाते.

पोर्तुगीजांच्या दप्तरातही राणीचा उल्लेख ‘बुक दैवी चौरा’ असा केला आहे. पहिली महिला स्वातंत्र्यसेनानी म्हणून राणी अबक्का अजरामर झाली. राणी आधुनिक इतिहासात युरोपियन शत्रूशी लढणारी पहिली महिला स्वातंत्र्यसेनानी ठरली.

- Advertisment -

ताज्या बातम्या