धुळे – Dhule – प्रतिनिधी :
शहरातील देवपूर परिसरात चोरट्यांनी धाडसी चोरी करत पोलिसांना तपासाचे आव्हान दिले आहे. अज्ञात चार चोरट्यांनी घरात शिरून घरमालकाचे हातपाय बांधुन ठेवत घरातील रोकड आणि दागीने लूटून नेल्याची धक्कादायक घटना आज पहाटेच्या सुमारास देवपुरातील भूजल कॉलनीत घडली. विशेष म्हणजे चोरट्यांनी घरमालकाच्या पाळीव कुत्र्याला जवळच असलेल्या विहीरीत फेकुन दिले. घटनेमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
देवपूरातील पंचवटी भारत गॅस गोडाऊनच्या बाजूला असलेल्या भूजल कॉलनीत हमाली काम करणारे मुस्ताक पिंजारी हे राहतात. आज पहाटेच्या सुमारास अज्ञात चार चोरटे त्यांच्या घरात शिरले. त्यांनी घरमालक मुस्ताक पिंजारी, रोशन मुस्ताक पिंजारी, पत्नी यांना घरातच बांधून ठेवले.
त्यानंतर त्यांनी घरातील कपाटात ठेवलेल्या बारा हजार रुपयांच्या रोकडसह 40 हजार रूपयाचे चांदीचे कडे, महिलेच्या कानातील 15 ग्रॅम वजनाचे सोने काढून घेतले. विशेष म्हणजे चोरी करण्यापुर्वी घरमालकाचा पाळीव कुत्रा जवळच असलेल्या विहिरीत फेकून दिला होता. दरम्यान यापूर्वी मागील दीड वर्षापूर्वी याच ठिकाणी चोरी झाल्याचे मालक मुस्ताक पिंजारी यांनी सांगितले.
घटनेची माहिती मिळताच देवपूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. तसेच श्वान व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होत. याबाबत उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.