Wednesday, January 7, 2026
HomeनगरShirdi : ब्रेक दर्शनामुळे शुल्क पासमध्ये 50 टक्क्यांची घट

Shirdi : ब्रेक दर्शनामुळे शुल्क पासमध्ये 50 टक्क्यांची घट

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

साईबाबा संस्थानने प्रायोगिक तत्वावर सुरू केलेल्या ब्रेक दर्शन योजनेमुळे संस्थानच्या उत्पन्नावर प्रतिकूल परिणाम झाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे जनसंपर्क विभागातून शिफारस धारक भाविकांकडून शुल्क पासद्वारे मिळणार्‍या उत्पन्नात जवळपास 50 टक्क्यांची घट झाली आहे. संस्थान तदर्थ समितीने या निर्णयाचा तातडीने पुनर्विचार करावा, अन्यथा संस्थानच्या अर्थकारणावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -

संस्थानचे तत्कालीन अध्यक्ष जयंत ससाणे यांच्या अध्यक्षतेखालील शासन नियुक्त विश्वस्त मंडळाने संस्थानच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या उद्देशाने आणि तथाकथित व्हीआयपी यांच्या संख्येवर नियंत्रणासाठी पीआरओ कार्यालयातून मिळणार्‍या शिफारशीच्या आधारे भाविकांना 200 रुपयांचा पेड पास देण्याची योजना सुरू केली होती. या योजनेला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. या मार्गाने संस्थानला दरवर्षी सरासरी 60 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत होते.

YouTube video player

मात्र, सध्या कार्यरत तदर्थ समितीने ‘ब्रेक दर्शन’ नावाने एक नवीन व्यवस्था लागू केली असून, त्याचा परिणाम म्हणजे पेड पाससाठी येणार्‍या भाविकांची संख्या लक्षणीय प्रमाणात घटली आहे. पूर्वी दिवसाला 200 ते 300 भाविक पीआरओ कार्यालयातून शिफारसपत्र घेऊन पेड पास घेत होते. आता मात्र ही संख्या केवळ 120 च्या आसपास राहिल्याचे समोर आले आहे. विशेष बाब म्हणजे, संस्थानने ब्रेक दर्शनाची किंमत 200 रुपयांऐवजी वाढवण्याची गरज होती, त्यामुळे उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता होती.

मात्र, तसे काही न करता योजनेची अंमलबजावणी करताना एकंदरच गोंधळाची स्थिती निर्माण झाल्याचे दिसून येते. याउलट याच संस्थानात अतिविशिष्ट व्यक्ती म्हणजे राजकारणी, सेलिब्रिटी, उद्योजक, अधिकार्‍यांना कोणत्याही अडथळ्याशिवाय पुन्हा जुन्याच पद्धतीने दर्शन मिळत आहे. त्यामुळे ब्रेक दर्शन योजना नेमकी कोणासाठी आणि कशासाठी आहे, असा प्रश्न अनेक भाविक विचारू लागले आहेत. साईबाबा संस्थानला दरवर्षी सरासरी 511 कोटी रुपयांचे दान मिळते, तर खर्च सुमारे 500 कोटींच्या आसपास असतो. अशा परिस्थितीत उत्पन्नात घट झाल्यास संस्थानच्या आर्थिक गणितावर परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

भाविकांच्या मागणीनुसार आणि व्यवस्थेतील पारदर्शकतेच्या दृष्टीने, ब्रेक दर्शन संदर्भात तदर्थ समितीने घेतलेल्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची गरज असल्याची चर्चा आहे. अन्यथा संस्थानच्या दानावर व उत्पन्नावर होणारा परिणाम भविष्यात अधिक गंभीर ठरू शकतो. राजकारणी, सेलिब्रिटी, उद्योजक, अधिकारी यांना पूर्वीप्रमाणेच कधीही व्हीआयपी दर्शन मिळते, मग शिफारस धारकांची काय अडचण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिर्डीतील नगरसेवक, पदाधिकारी यांच्याकडून दर्शनासाठी होत असलेल्या शिफारसी संस्थान प्रशासनाला मान्य नाहीत का? पासच्या तथाकथित गैरव्यवहार करणार्‍यांवर कारवाई करण्यात संस्थान प्रशासन अयशस्वी ठरले आहे का? पेड पास घेऊन दर्शन घेण्याऐवजी गावकरी गेटमधून परप्रांतीय दर्शन घेणार्‍यांवर कसे नियंत्रण आणणार, असे प्रश्न संस्थान प्रशासनाला विचारले जात आहेत.

ब्रेक दर्शनापूर्वी 200 रुपयांचा पास घेऊन पीआरओ शिफारसद्वारे दररोज सरासरी 300 भाविक दर्शन घेत होते. ब्रेक दर्शनाच्या निर्णयानंतर 22 जून रोजी 99 भाविकांनी, 23 जून रोजी 84 भाविकांनी, 24 जून रोजी 155 भाविकांनी शिफारस घेऊन ब्रेक दर्शन घेतले. म्हणजे ही संख्या निम्म्याने घटली.

ताज्या बातम्या

अपघाताचा बनाव उघड, तपासात खून असल्याचे स्पष्ट

0
त्र्यंबकेश्वर | वार्ताहर Trimbakeshwar जुन्या अपघाताच्या गुन्ह्याचा तपास करताना तो अपघात नसून खून असल्याचे निष्पन्न झाल्याने सराईत आरोपीस अटक करण्यात आली आहे. त्रंबकेश्वर...