जळगाव | प्रतिनिधी
राष्ट्रीय आपत्ती निवारण कायदा, साथरोग नियंत्रण कायदा, लॉकडाऊनच्या काळात दारुची अवैध विक्री व इतर कलमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आर. के. वाइन्सचा परवाना कायमस्वरुपी रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी निर्गमित केले आहे. या अनुज्ञप्ती रद्दची मागणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्हाधिकार्यांकडे केली होती.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन, संचारबंदीच्या कालावधीत मद्य विक्रीस बंदी आहे. अशा कालावधीत स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक बापू रोहोम व त्यांच्या सहकार्यांना गुप्त माहिती मिळाली होती की, आर.के.वाइन शॉप दुकानाच्या बाहेर एका पांढर्या रंगाच्या टाटा इंडिगो गाडीत आर.के.वाइन शॉपचे मालक दारू विक्री करीत आहे. त्यानुसार पोलिसांनी संबंधित गाडीजवळ रविवारी धाड टाकली होती.
पोलिसांनी नितीन शामराव महाजन (वय २९, अजिंठा हौसिंग सोसायटी समाजमंदिराजवळ) आणि नरेंद्र अशोक भावसार (वय ३३, शांतीनिकेतन हौसिंग सोसायटी, अयोध्यानगर) यांना ताब्यात घेतले होते. पांढर्या रंगाच्या टाटा इंडिगो गाडी (क्र.एमएच १८ डब्ल्यू ९८४२) मध्ये दारुचे बॉक्स सापडले. ही दारू आर.के.वाइनचे मालक दिनेश राजकुमार नोतवाणी (आदर्शनगर) यांनी त्यांच्या दुकानातून काढून दिली. पोलिसांना बघून ते निघून गेल्याचे महाजन याने पोलिसांना सांगितले. नंतर पोलिसांनी दिनेश नोतवाणी यास देखील हजर केले.
या कारवाईत चार लाख ६० हजार ५४ रुपयांची अवैध विदेशी दारू पकडून पाच जणांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. पोलिसांनी लायसन्सबाबत नोतवाणी यास विचारले असता, दोन्ही लायसन्स त्याची पत्नी दिशान दिनेश नोतवाणी यांच्या नावावर आहे. दुकानावर मॅनेजर गणेश कासार (शिवाजीनगर) आहे. ही दारू नोतवाणी व कासार याने संबंधितांना काढून दिल्याचे सांगण्यात आले होते. पोलिसांनी महाजन व भावसार यांच्याकडील गाडीमधील दारू ताब्यात घेतली होती.
याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक अमोल ज्ञानेश्वर पाटील यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन नितीन महाजन, नरेंद्र भावसार, दिनेश नोतवाणी, मॅनेजर गणेश कासार, दिशान दिनेश नोतवाणी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तर महाजन व भावसार आणि दिनेश नोतवाणी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.