Saturday, May 4, 2024
Homeनंदुरबारनंदुरबार : जिल्हा परिषदेतर्फे करोना योद्ध्यांसाठी २५ लाखांचे सुरक्षा कवच -ॲड.सिमा वळवी

नंदुरबार : जिल्हा परिषदेतर्फे करोना योद्ध्यांसाठी २५ लाखांचे सुरक्षा कवच -ॲड.सिमा वळवी

नंदुरबार | प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या विविध विभागांमार्फत जिल्हाभरात कोरोना (कोवीड -१९) या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अहोरात्र प्रयत्न सुरू असून, राज्य व केंद्र शासनाने दिलेल्या सूचनांचा अवलंब करून जिल्ह्यातील नागरिकांना कोरोनापासून बचावा बरोबरच रोजगार उपलब्ध करून देणे, गावागावात स्वच्छता ठेऊन, निर्जंतुकीकरण प्रक्रिया राबविणे, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देणे, अशा विविध कामांचा समावेश आहे.

- Advertisement -

कोरोना आजाराच्या संकटावर मात करण्यासाठी जिल्हापरिषदेचे विविध विभागाचे कर्मचारी अहोरात्र मेहनत घेऊन जीवाची पर्वा न करता काम करत आहेत. कोरोनाशी लढणार्‍या संपूर्ण यंत्रणेला कोरोना योद्धा असे संबोधून या योध्यासाठी सानुग्रह अनुदान म्हणून २५ लक्ष रुपये मदत देण्याची योजना जिल्हा परिषदेमार्फत घोषीत करण्यांत आली आहे अशी माहिती जि.प.अध्यक्षा ॲड.सिमा पद्माकर वळवी यांनी दिली.

नंदुरबार जिल्हा परिषदेत झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी ॲड.सिमा वळवी म्हणाल्या कि, कोरोना (कोविड१९) या विषाणूचा प्रादुर्भाव आपल्या जिल्ह्यात होऊ नये, यासाठी जिल्हा परिषद अंतर्गत येणारे आरोग्य विभागाचे कर्मचारी, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी कार्यकर्त्या, अंगणवाडी मदतनीस, आशा कार्यकर्त्या या सर्वांच्या माध्यमातून जनतेमध्ये जनजागृती करणे, स्वच्छता मोहीम राबविणे, आरोग्याची काळजी घेणे अशी विविध कामे केली जात आहेत.

आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यातील गावागावांत युध्द पातळीवर कामकाज सुरू असून, जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांना मार्च महिन्यातच कोरोना बाबत प्रशिक्षण देण्यात आले. जिल्ह्यात प्रत्येक गावांत जनजागृती साहित्याचा पुरवठा करण्यात आला. आशा कार्यकर्ती व आरोग्य कर्मचार्‍यांमार्फत घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून जनजागृती करण्यात आली. त्यानंतरसहा तालुक्यांतील दहा ठिकाणी विलगीकरण कक्ष तयार करण्यात आले.

पोलीसांकडून तयार करण्यात आलेल्या सर्व चेक पोस्टवर आरोग्य कर्मचार्‍यांची नेमणूक करून प्रवाश्यांची वैद्यकीय तपासणी करून घेण्यात आली. कोरोना बाधीत आढळुन आलेल्या व्यक्तीच्या घरापासून एक किलोमीटर क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केल्यानंतर आरोग्य विभागाने नागरिकांना घरातच विलगीकरण करण्याच्या सूचना दिल्या. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये वैद्यकीय अधिकारी, आशा कर्मचारी, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक यांचे पथक तयार करून घरोघरी सर्वेक्षण करण्यात आले. रुग्णांच्या प्रथम संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात संदर्भित करण्यात आले. कुठल्याही आजाराची लक्षणे असणार्‍या व्यक्तींची तपासणी करून त्यांना उपचार देण्यात आले. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये १४ दिवस नियमित घरोघरी सर्वेक्षण करण्यात आले.

या सर्व कामासाठी जिल्ह्यातील सहा तालुका आरोग्य अधिकारी, १५२ वैद्यकीय अधिकारी, १०४ सहाय्यक वैद्यकिय अधिकारी, ५२ प्रशासन अधिकारी, ५१ औषध निर्माता, ७४ पुरुष अंगणवाडी कार्यकर्ती आणि १८७२ आशा कर्मचारी व इतर विभागाचे अधिकारी व कर्मचारी अहोरात्र सेवा बजावत आहेत. या आजारापासून बचावासाठी जिल्हा परिषदेमार्फत खरेदी करण्यात आलेले तसेच विविध सामाजीक संस्थातर्फे पुरवठा करण्यांत आलेले फेस मास्क, फेस शील्ड, सॅनीटायझर, पीपीई किट, हॅन्ड ग्लोज असे साहित्य यांसाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.

जिल्ह्यात १४ मे पर्यंत २१ कोरोना बाधीत आढळून आले होते. त्यात शेवटचा रुग्ण आठ मे रोजी आढळुन आला. संपूर्ण जिल्ह्यात आठ प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले होते. जिल्ह्यात आढळुन आलेल्या २१ रुग्णांच्या प्रथम संपर्कात आलेल्या ३४४ व्यक्तींची ओळख करून त्यांची तपासणी करून त्यांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले. जिल्ह्यातील दहा विलगीकरण कक्षांमध्ये १०४५ संशयित रुग्णांना दाखल करण्यात आले होते. १४ दिवसाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

या कक्षांमध्ये आज १३५ रुग्ण दाखल आहेत. सर्वांच्या देखरेखीची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत काम करणारे सर्व अधिकारी व कर्मचारी अहोरात्र मेहनत करून पार पाडत आहेत. कोविड -१९ आजाराच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने महामारी घोषीत केले असून, या संकटावर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेचे विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी अहोरात्र मेहनत घेऊन जीवाची पर्वा न करता काम करत आहेत.

या कर्मचार्‍यांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता लक्षात घेऊन या अधिकारी व कर्मचार्‍यांचे मनोबल वाढविण्यासाठी व हे कर्मचारी बाधीत रुग्णांच्या प्रत्यक्ष सहवासात येत असल्याने कर्मचार्‍यांच्या जीवाचे बरे वाईट झाल्यास त्यांच्या वारसांना अर्थसहाय्य देण्यासाठी कोरोना योद्धा सानुग्रह अनुदान ही योजना जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येत असून, कोरोना मुळे मयत होणार्‍या जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचार्‍यांच्या वारसांना २५ लक्ष रुपये अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

साथरोग अधिनियम १८९७ अंतर्गत साथरोग आटोक्यात येईपर्यंत किंवा ३० जुलै २०२० पर्यंत मृत्यू पावणार्‍या व कोरोना बाधीत रुग्णांच्या सेवेमध्ये प्रत्यक्ष कार्यरत असणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांसाठी ही योजना लागू राहणार आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेत जि.प.अध्यक्षा ॲड.सिमा वळवी यांनी दिली. यावेळी मुख्यकार्यकारी अधिकारी विनय गौडा, जि.प.उपाध्यक्ष ॲड.राम रघुवंशी, जि.प.बांधकाम सभापती अभिजीत पाटील, जि.प.समाजकल्याण सभापती रतन पाडवी, शिक्षण सभापती सौ.जयश्री दिपक पाटील, सभापती सौ.निर्मला राऊत, उपमुख्यकार्यकारी अधिकारी भुपेंद्र बेडसे आदी उपस्थीत होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या