Friday, May 31, 2024
Homeनंदुरबारनंदुरबार जिल्हा करोनामुक्त

नंदुरबार जिल्हा करोनामुक्त

नंदुरबार | प्रतिनिधी

जिल्हयातील शेवटचे दोन रुग्णदेखील कोरोनामुक्त झाले असल्याने नंदुरबार जिल्हा आज पूर्णपणे कोरोनामुक्त झाला आहे. आज सायंकाळी ५ वाजता या दोन्ही रुग्णांना जिल्हा रुग्णालयातून सुटी देण्यात येणार आहे.

- Advertisement -

जिल्ह्यात दि.१७ एप्रिल ते ८ मे दरम्यान एकुण २१ कोरोनाचे रुग्ण आढळून आले होते. गेल्या दहा दिवसांपासून जिल्हयात नव्याने एकही रुग्ण आढळून आलेला नाही. बामखेडा येथे दोन दिवसांपुर्वी एक रुग्ण आढळला होता. परंतू तो नाशिक जिल्हयात दाखल आहे. त्यामुळे जिल्हयात कोरोनाबाधीतांची संख्या २१ होती.

यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित १९ पैकी दि.६ मे रोजी नंदुरबारातील पहिले चार रुग्ण कोरोनामुक्त झाले होते. दि.७ मे रोजी शहादा येथील ५२ वर्षीय महिला कोरोनामुक्त झाली.  त्यानंतर दि.९ रोजी अक्कलकुवा येथील तीन व शहादा येथील एक असे चार रुग्ण कोरोनामुक्त झाले होते.

दि.१५ मे रोजी शहादा येथील तीन पुरुष, दोन मुली आणि अक्कलकुवा येथील एक जण कोरोनामुक्त झाला. दि. १६ मे रोजी शहादा येथील ६५ वर्षीय इसमाचा कोरोना अहवाल निगेटीव्ह आला. दि.१७ रोजी पोलीस कर्मचारी कोरोनामुक्त झाला. दरम्यान, आज दि.१८ रोजी शेवटचे दोन रुग्णदेखील कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांचे कोरोना अहवाल निगेटीव्ह आले आहेत.

यात नंदुरबार तालुक्यातील नटावद येथील एक पुरुष तर आष्टे येथील महिला रुग्णाचा समावेश आहे. यासोबत नंदुरबार जिल्हा हा पूर्णपणे कोरोनामुक्त झाला आहे. जिल्हयात एकुण २१ पॉझिटीव्ह रुग्णांपैकी १९ रुग्णांनी कोरोनावर विजय मिळविला असून दोघांचा मृत्यू झाला आहे. शेवटचे दोन कोरोनामुक्त रुग्णांना आज सायंकाळी ५ वाजता जिल्हा रुग्णालयातून सुटी देण्यात येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या