मोहाडी पोलिसांची कारवाई
धुळे (प्रतिनिधी) –
शहरातील मोहाडी गावातील तिखी रोडवरील म्हाडा वस्तीत एकाकडे छापा टाकून पोलिसांनी सव्वा लाखांचा विदेशी दारूचा साठा जप्त केला आहे.
काल दि.१५ रोजी रात्री ही कारवाई करण्यात आली. एकाला ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या गुप्त माहितीवरून उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडी पोलिस ठाण्याचे पथकाने काल रात्री मोहाडी गावातील तिखी रोडवरील म्हाडा वस्तीत राहणारा मुक्तार मुन्ना कुरेशी याच्या घरी छापा टाकला.
त्याला जागीच पकडून त्याच्याकडुन फक्त गोवा राज्यात विक्री करीता असलेल्या रॉयल स्टॅग, मॅकडॉवल नं.१, रॉयल चॅलेंज, इंपेरिअल ब्ल्यु असे वेगवेगळया महागडया विदेशी मद्याचा बाटल्या जप्त करण्यात आला. त्यांची किंमत १ लाख १५ हजार ८२० रूपये आहे. याप्रकरणी मुक्तार मुन्ना कुरेशी याच्याविरूध्द मोहाडी पोलिस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपास हेकॉ ब्राम्हणे करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधिक्षक विश्वास पांढरे, अप्पर पोलीस अधिक्षक डॉ.राजु भुजबळ, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडीनगर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतिष गोराडे व गुन्हे शोध पथकातील हेकॉ.प्रभाकर ब्राम्हणे, पोना तुषार जाधव, पोकॉ गणेश भामरे, जितेंद्र वाघ, सचिन वाघ, दिपक महाले, कांतीलाल शिरसाठ यांच्या पथकाने केली आहे.