मुंबई l प्रतिनिधी
ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांचे करोनाच्या संसर्गामुळे मुंबईत शनिवारी निधन झाले. ते 81 वर्षांचे होते. गेले काही दिवस त्यांना थकवा जाणवत असल्याने त्यांना चार दिवसांपूर्वी गोदरेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
करोनाची लक्षणे आढळून आल्याने त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. ही टेस्ट दुर्दैवाने पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर उपचारांसाठी त्यांना सेवन हिल्स रुग्णालयात हलवण्यात आले होते. याच दवाखान्यात त्यांचे उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले.
लेखक, नाटककार, रंगकर्मी , चित्रपट दिग्दर्शक अशा सर्व भूमिका त्यांनी अत्यंत ताकदीनं निभावल्या. मतकरी यांच्या गूढकथा या वाचकांमध्ये लोकप्रिय होत्या.
मोठ्यांसाठी सत्तर तर मुलांसाठी बावीस नाटकं, अनेक एकांकिका, वीस कथासंग्रह, तीन कादंबऱ्या, बारा लेख संग्रह, आत्मचरित्रात्मक ग्रंथ ‘माझे रंगप्रयोग’ अशी त्यांची साहित्यसंपदा आहे.
‘गहीरे पाणी’, ‘अश्वमेध’, ‘बेरीज वजाबाकी’ या मालिका, तसच त्यांच्या इन्वेस्टमेन्ट सिनेमाचा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
मतकरींच्या पश्चात त्यांच्या पत्नी प्रतिभा मतकरी, कन्या अभिनेत्री सुप्रिया विनोद, मुलगा गणेश मतकरीझ सून आणि नातवंडे, असा परिवार आहे. मतकरींच्या जाण्याने साहित्य आणि रंगभूमी या क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.