Thursday, September 12, 2024
Homeनगरएक कोटीची लाच प्रकरण: अखेर अभियंता वाघ गजाआड

एक कोटीची लाच प्रकरण: अखेर अभियंता वाघ गजाआड

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

एक कोटीच्या लाच प्रकरणातील पसार असलेला कार्यकारी अभियंता गणेश वाघ याला नाशिक लाचलुचपत विभागाच्या पथकाने ताब्यात घेत गजाआड केले आहे. तो मुंबईहून धुळ्याच्या दिशेने जात असताना नाशिकजवळ सापळ्यात अडकला. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले आहे.

- Advertisement -

छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय ठेकेदार यांनी अहमदनगर येथील औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत 100 एम एम व्यासाची पाईपलाईन टाकण्याचे काम केले होते. या 31 कोटींच्या कामाचे राहिलेले 2 कोटी 66 लाख 99 हजार 244 रूपयांचे बिल काढण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) अहमदनगर उपविभागाचा सहाय्यक अभियंता अमित किशोर गायकवाड याला नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्वप्निल राजपूत यांनी नगर शहराजवळ सापळा रचून तब्बल एक कोटी रूपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. त्याने सदरची लाच स्वतःसाठी तसेच तत्कालीन उपविभागीय अभियंता वाघ याच्या करीता स्वीकारली असल्याचे सिद्ध झाले. त्यानुसार दोघांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी अभियंता अमित किशोर गायकवाड याची यापूर्वीच न्यायालयाने जामीनावर सुटका केली आहे. मात्र, उपअभियंता वाघ दहा दिवसांपासून पसार होता. त्याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावर निर्णय होण्यापूर्वीच त्याला नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे. त्याला न्यायालयासमोर हजर आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या