संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner
ज्या पोलीस ठाण्यात लाचलुचपत पथकाची कारवाई होईल त्या पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुख्यालयात धाडले जाण्याची परंपरा आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक बाळासाहेब यादव यांना पोलीस ठाण्यातच आठशे रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक पोलीस निरीक्षकांवर कारवाई करणार का? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील कारवाई ही एका अधिकार्यावर झाली आहे. पोलीस निरीक्षकाच्या मर्जीतील असणारा अधिकारी लाचलुचपत खात्याच्या सापळ्यात अडकला आहे. त्यामुळे पोलीस निरीक्षकांची उचलबांगडी होणार की पोलीस अधिक्षक त्यांना पाठीशी घालणार हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरले आहे. दहा दिवसांवर दिवाळी आली आहे. लोक फटाक्यांचे स्टॉल लावण्यासाठी परवानगी मागायला येत आहे. मात्र, शहर पोलीस ठाण्यात मलिदा लाटण्यासाठी मोठ्या प्रमाणात घाट घातला आहे. किरकोळ विक्रेता असणार्या स्टॉलवाल्याकडून देखील अपेक्षा केली जात आहे.
कारवाई झालेला लाचखोर अधिकारी पोलीस निरीक्षकांचा विश्वासू होता. संगमनेर शहर पोलीस ठाणे नेहमी वादाच्या भोवर्यात अडकले आहे. काही वर्षांपूर्वी या पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक राणा परदेशी यांच्यावर लाचलुचपतची कारवाई झाली तेव्हा तत्कालीन पोलीस निरीक्षक अभय परमार यांना मुख्यलयात पाठवण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा पोलीस नाईक बापूसाहेब देशमुख यांच्यावर लाचलुचपत पथकाने कारवाई केली तेव्हा पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना मुख्यालयात जावे लागले. त्यामुळे, आता पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्यावर पोलीस अधीक्षक काय कारवाई करतात याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.