नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
राज्यातील शाळांमध्ये करण्यात येणारी हिंदी सक्तीच्या विषयांवर आक्रमक पवित्रा घेतलेल्या मनसे नेते राज ठाकरे यांना भाजप नेत्याने आव्हान दिले आहे. राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे भाजप नेते बृजभूषण शरण सिंह यांनी पुन्हा एकदा राज ठाकरे यांच्याविरोधात दंड थोपटले आहे. उत्तर भारतीय तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष आहे, त्यांच्यापैकी कोणी आव्हान दिले तर राज ठाकरेंना ते झेपणार नाही, अशा शब्दांत बृजभूषण शरण सिंह यांनी टीका केली आहे. ‘भाषा जोडण्याचे काम करते, तोडण्याचे नाही. महाराष्ट्र आणि उत्तर भारतीय यांचे जे नाते आहे, ते तुमच्या या प्रकारामुळे तुटणार नाही,’ असे बृजभूषण यांनी म्हटले आहे.
बृजभूषण शरण सिंह म्हणाले, मी राज ठाकरे यांना सांगू इच्छितो की त्यांनी थोडे वाचावे. आज ज्या गोष्टींचा तुम्हाला अभिमान आहे, त्या अभिमानाच्या इतिहासात उत्तर भारतीयांचा घाम आहे. तुम्ही खूप स्वस्त राजकारण करत आहात. छत्रपती शिवाजी महाराज यांना औरंगजेबाने जेव्हा आग्रात कैद केले होते, तेव्हा आमच्या आग्रा येथील व्यापाऱ्यांनी त्यांना कैदेतून मुक्त करण्यासाठी मदत केली होती, असे ब्रिजभूषण शरण सिंह म्हणाले.
ब्रिजभूषण शरण सिंह पुढे म्हणाले, राज ठाकरे यांनी जेव्हा अयोध्येत येण्याचा कार्यक्रम निश्चित केला, तेव्हा मी त्यांना अयोध्येत येऊ न देण्याचा इशारा दिला होता. त्यावेळी राज ठाकरे यांनी आपला दौरा रद्द केला. परंतु आता पुन्हा आपले रंग दाखवत आहेत. राज ठाकरे हे देखील कुठेतरी अयोध्येशी जोडलेले आहेत. तरीही त्यांचे कार्यकर्ते उत्तर भारतीयांना मारहाण करतात हे योग्य नाही”, असे ब्रिजभूषण शरण सिंह यांनी म्हटले आहे.
राज ठाकरेंमुळे आता उत्तर भारतातील तरुणांमध्ये त्यांच्याबाबत रोष आहे. ते एवढे संतापलेले आहेत की एखाद्या व्यक्तीने आव्हान दिलं की चला राज ठाकरेंच्या भेटीला जायचे, तर राज ठाकरेंना ते झेपणार नाही. त्यामुळे मी हे जबाबदारीने सांगतो की राजकारण करायचं तर करा. पण भाषा, जात आणि धर्माच्या आधारावर राजकारण करू नका”, असे बृजभूषण शरण सिंह यांनी म्हटले आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





