अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
सातवड (ता. पाथर्डी) येथील संत्र्याच्या बागेत एका तरुणाचा खून झाल्याची घटना उघडकीस आली होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या रहस्यमय खुनाचा छडा लावला असून, धक्कादायक वास्तव समोर आले आहे. कौटुंबिक वादातून भावानेच आपल्या लहान भावाचा निर्दयपणे खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
मयत सोमनाथ रामराव पाठक (वय 32) याचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना समांतर तपास करण्याचे आदेश दिले होते. गुन्हे शाखेने तपास सुरू केला. प्राथमिक चौकशीत हा अपघाती मृत्यू असल्याचे भासवले गेले. मात्र, शवविच्छेदन अहवाल व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे हा खून असल्याचे स्पष्ट झाले. या घटनेनंतर पोलिसांनी संशयित आरोपी डॉ.अशोक रामराव पाठक (वय 39, रा. सातवड, ता. पाथर्डी, हल्ली रा. नवनाथनगर, ता. राहाता) याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली. मयत सोमनाथ याला दारूचे व्यसन होते. तो दारूच्या नशेत आई व आपल्या मुलाला वारंवार मारहाण करीत होता.
वारंवार समज देऊनही त्याच्या वागणुकीत सुधारणा होत नसल्याने मोठा भाऊ अशोक 9 मार्च रोजी त्याला समजवण्यासाठी गावी आला. मात्र, त्यादिवशीही सोमनाथ दारूच्या नशेत होता आणि त्याने आई व मुलाला धमकावण्यास सुरूवात केली. या वादातून संतप्त झालेल्या अशोकने लाकडी दांडक्याने सोमनाथच्या डोक्यावर, छातीवर व शरीराच्या इतर भागांवर मारहाण केली. जीव वाचवण्यासाठी सोमनाथ शेतात पळून गेला, मात्र अशोकने त्याचा पाठलाग करत त्याला पकडले आणि झाडाला बांधले. त्यानंतर हालचाल थांबली असता अशोक घाबरून घटनास्थळावरून पसार झाला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पुढील तपास पाथर्डी पोलीस करत आहेत. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार सुरेश माळी, ज्ञानेश्वर शिंदे, संदीप दरंदले, विजय ठोंबरे, अरुण गांगुर्डे, किशोर शिरसाठ, बाळासाहेब खेडकर, फुरकान शेख, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड व चंद्रकांत कुसळकर यांनी केला.