Friday, April 25, 2025
Homeक्राईमसख्ख्या भावाचा खून करणार्‍या बापलेकास जन्मठेप

सख्ख्या भावाचा खून करणार्‍या बापलेकास जन्मठेप

ब्राह्मणवाडा येथील घटना || संगमनेरच्या न्यायालयाचा निकाल

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

आईचे दागिने गहाण ठेवणार्‍या सख्ख्या भावाबाबत अपशब्द काढल्याचा राग मनात धरून भावानेच आपल्या मुलासह एकाच दिवसांत दोनवेळा हल्ला करीत त्याचा जीव घेतला. याप्रकरणी अकोले पोलिसांनी बापलेकासह दोन महिलांवर खुनासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करीत त्यांना अटक केली होती. या प्रकरणाचा खटला संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयासमोर सुरू असताना जिल्हा न्यायाधीश योगेश मनाठकर यांनी बुधवारी या प्रकरणाचा निकाल दिला. भावाचा खून करणार्‍या मार्तंड मनोहर आरोटेसह त्याचा मुलगा मयूर याला जन्मठेप व प्रत्येकी 15 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणातील दोन्ही महिलांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

- Advertisement -

11 मार्च 2022 रोजी सदरचा प्रकार ब्राह्मणवाडा (ता. अकोले) येथे घडला होता. रवींद्र मनोहर आरोटे व त्यांची पत्नी ललिता हे दोघे ब्राह्मणवाड्यातील त्यांच्या शेतात ज्वारी काढण्यासाठी उपनेरची वाट बघत असताना मयत रवींद्र यांची आई राधाबाई यांनी त्यांचा दुसरा मुलगा मार्तंड याने गहाण ठेवलेले दागिने वारंवार सांगूनही परत आणले नसल्याचे त्यांना सांगितले. त्यावर मयत रवींद्र यांनी तू त्याला दागिने देताना विचार करायचा होता, आता काय उपयोग? तो फुकट्याच आहे असे प्रत्युत्तर दिले. या दोघांत सुरू असलेला संवाद तेथून जवळच असलेल्या गायींच्या गोठ्याजवळ उभ्या असलेल्या आरोपी मार्तंडने ऐकला आणि तो कुर्‍हाड घेवून त्यांच्याजवळ आला. त्यावेळी त्याने शिवीगाळ करीत त्यांच्या डोक्यात कुर्‍हाडीने घाव घातला. त्यांची पत्नी भांडण सोडवण्याचा प्रयत्न करीत असतानाच आरोपीने त्यांनाही लाकडी दांड्याने मारहाण केली. हा प्रकार सुरु असताना त्यांच्या भावकीतील अन्य लोकांनी मध्यस्थी करुन त्यांची भांडणं सोडवली व जखमी रवींद्र आरोटे यांना गावातील दवाखान्यात नेले.

त्याच दिवशी सायंकाळी पाचच्या सुमारास उपनेरवाला आल्याने दोघेही पुन्हा जवळच असलेल्या शेतात गेले असता आरोपी मार्तंड, त्याची पत्नी शकुंतला, मुलगा मयूर व त्याची बायको सोनाली हे चौघेही तेथे आले. रवींद्र आरोटे यांना शिवीगाळ करीत मार्तंडने आज याला मारुनच टाकू, अशी धमकी दिल्याने रवींद्र आरोटे तेथून घराकडे पळाले व पडवीत जाऊन थांबले. आरोपींनी त्यांचा पाठलाग केला आणि घराच्या पडवीत जावून पुन्हा त्यांना लाकडी दांडा आणि फावड्याने बेदम मारहाण केली. त्यात ते रक्तबंबाळ झाल्यानंतर ते दोघेही तेथून निघून गेले. जखमी रवींद्र यांना अन्य नातेवाईकांच्या मदतीने सुरुवातीला ब्राह्मणवाडा व नंतर आळेफाटा येथे उपचारार्थ नेण्यात आले. मात्र तेथे उपचार सुरु असतानाच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी अकोले पोलिसांनी आरोपी मार्तंड मनोहर आरोटे, त्याची पत्नी शकुंतला, मुलगा मयूर व सून सोनाली यांच्यावर खुनासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून चौघांनाही अटक केली.

सदरचा खटला अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश योगेश मनाठकर यांच्यासमोर चालला. या खटल्यात सरकार पक्षाकडून सरकारी वकील बी. जी. कोल्हे यांनी सात साक्षीदार तपासले. जखमी रवींद्र आरोटे यांच्यावर घटनेच्या दिवशी दोनवेळा उपचार करणारे डॉक्टर, फिर्यादी व अन्य साक्षीदारांनी दिलेली साक्ष न्यायालयाने ग्राह्य धरली. शिवाय सरकारी वकील बी. जी. कोल्हे यांनी केलेला प्रबळ युक्तिवाद मान्य करीत न्यायालयाने आरोपी मार्तंड मनोहर आरोटे व त्याचा मुलगा मयूर मार्तंड आरोटे या दोघांना दोषी ठरवून जन्मठेप व प्रत्येकी 15 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तर सबळ पुराव्याअभावी शकुंतला मार्तंड आरोटे व सोनाली मयूर आरोटे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...