Wednesday, May 22, 2024
Homeनगरपक्षात येणार्‍यांना बीआरएसची आचारसंहिता पाळावीच लागेल - खा. बी. बी. पाटील

पक्षात येणार्‍यांना बीआरएसची आचारसंहिता पाळावीच लागेल – खा. बी. बी. पाटील

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

आमच्या पक्षात जे येतील त्यांना पक्षाची ध्येयधोरणे, नियम, आचारसंहिता पाळावी लागेल. भाजपचे नाव न घेता इतर पक्षांची जी अवस्था झाली ती आपल्या पक्षाची होऊ देणार नाही, असे ठाम प्रतिपादन राष्ट्र समिती पक्षाचे (बीआरएस) खासदार बी.बी.पाटील यांनी केले.

- Advertisement -

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी भारत राष्ट्र समिती पक्षाने (बीआरएस) महाराष्ट्रात पाय रोवण्याच्यादृष्टीने जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. नागपूर, नांदेड, औरंगाबाद, जिल्ह्यात लक्ष केंद्रीत केल्यानंतर नगर जिल्ह्यातही पक्षाच्या विस्तारासाठी प्रयत्न चालविले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बीआरएसचा श्रीरामपुरात शिरकाव झाल्यानंतर कार्यकर्ता मेळाव्यासाठी खासदार बी.बी.पाटील आले असता पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माणिकराव कदम, समन्वयक बी.जे. देशमुख, सुवर्णा काटे, बाळासाहेब सानप, अशोक बागुल आदींसह अनेक पदाधिकारी उपस्थितीत होते. यावेळी या सर्वानी पत्रकारांशी संवाद साधला.

सध्या महाराष्ट्रात राजकीय परिस्थिती अत्यंत वाईट आहे. महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी जनतेची अत्यंत वाईट अवस्था आहे. राज्यात अनेक शेतकरी आत्महत्या करीत आहेत. याउलट तेलंगणा राज्यात उलटी परिस्थिती आहे. 2014 साली निर्माण झालेल्या राज्याची परिस्थिती मराठवाडा विदर्भासारखी वाईट होती. मात्र तेथील सरकारने सुयोग्य नियोजन करून शेतकर्‍यांचे कर्ज माफ केले. कृषी पंपांना 24 तास मोफत वीजपुरवठा केला. शेतकरी स्वावलंबी केल्याने शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबल्या. 83 हजार कोटी रुपये खर्चाची जगातील सर्वात मोठी पाणी लिफ्ट योजना तयार केली. त्यामुळे 37 लाख एकर शेती पाण्याखाली आली.

तर प्रत्येक गावात प्युरीफाईड वॉटर योजना पोहचवली. तेलंगणातील कायदा-सुव्यवस्था उत्तम आहे. गुन्हेगार पकडण्यासाठी विशेष यंत्रणा तयार केल्याने या राज्यात मोठी गुन्हेगारी होत नाही. शिक्षणात प्रगती करीत हजारो शासकीय शाळा उभ्या केल्या. सरकार एका विद्यार्थ्यामागे सुमारे सव्वा लाख रुपये खर्च करते. सर्व फी सरकार भरते. महिलांना गरोदर असल्यापासून मूल झाल्यानंतर सहा महिन्यांपर्यंत उपचार आणि अन्य सुविधा दिल्या जातात. अशा एक ना अनेक कल्याणकारी योजना यशस्वी करून गुजरात पेक्षाही चार पाऊल पुढचा तेलंगणा पॅटर्न निर्माण केला. सत्ता आल्यास तेलंगणा पॅटर्न राबवून तीन चार वर्षात महाराष्ट्र तेलंगणा सारखा सुजलाम् सुफलाम् करून दाखवू असेही सांगितले.

दरम्यान, देशातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनी प्रवेश केल्याने त्यांचा काँग्रेस राष्ट्रवादी झाल्याचा आरोप होत आहे. मात्र आपण तसे होऊ देणार नाही.आपल्याही पक्षात अनेकजण येण्यास उत्सुक आहेत. मात्र त्यांना पक्षाचे ध्येय धोरण, नियम व आचारसंहिता पाळावी लागेल असे सांगितले. ध्येयधोरणे राबविताना काही अधिकारी अडथळे निर्माण करतात. त्यांना बाजूला करून तेलंगणात विकासाचा पॅटर्न राबविण्यात आल्याचेही ते सांगण्यास विसरले नाहीत.

तेलंगणाचा कसा विकास झाला हे दाखविण्यासाठी गावागावांतून 60 महिला आणि 60 पुरूषांना तेलंगणात नेऊन तेथील कामे दाखविण्यात येणार असल्याची माहिती समन्वयक बी.जे. देशमुख यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या