दिल्ली । Delhi
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज संसदेत २०२६-२०२७ या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करत आहे. मोदी सरकारच्या या कार्यकाळातील अर्थमंत्र्यांचा हा सलग नववा अर्थसंकल्प आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही अर्थसंकल्पातील आर्थिक तरतुदींइतकीच चर्चा अर्थमंत्र्यांच्या पेहरावाची, विशेषतः त्यांच्या साडीची होत आहे. आपल्या पेहरावातून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या सीतारमण यांनी यंदा तामिळनाडूच्या परंपरेचे प्रतिनिधित्व करणारी खास साडी परिधान केली आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत येताना हाताने विणलेली जांभळ्या (पर्पल) रंगाची ‘कांजीवरम सिल्क’ साडी परिधान केली आहे. ही साडी तामिळनाडूच्या प्राचीन आणि समृद्ध विणकाम वारशाचे प्रतीक मानली जाते. या साडीवर हलक्या सोनेरी तपकिरी रंगाचे ‘चेक्स’ असून, स्थानिक भाषेत याला ‘कट्टम’ नक्षी असे म्हटले जाते. साडीच्या पदराच्या काठावर (बॉर्डरवर) कॉफी ब्राऊन रंगाचे धाग्यांचे आकर्षक काम करण्यात आले आहे. त्यांच्या या लूकमुळे भारताच्या हस्तकला परंपरेचे दर्शन पुन्हा एकदा जागतिक व्यासपीठावर घडले आहे.
अर्थमंत्र्यांनी निवडलेला जांभळा रंग हा केवळ सौंदर्यापुरता मर्यादित नसून, त्यामागे एक विशेष सामाजिक संदेश दडलेला आहे. जांभळा रंग हा महिला सक्षमीकरण, प्रतिष्ठा, न्याय आणि समानतेचे प्रतीक मानला जातो. आंतरराष्ट्रीय महिला दिन आणि जगभरातील महिला हक्क चळवळींशी या रंगाचे जवळचे नाते आहे. त्यामुळे, यंदाच्या अर्थसंकल्पात सरकार महिलांचे शिक्षण, आरोग्य आणि आर्थिक स्वावलंबनावर मोठे निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
निर्मला सीतारमण नेहमीच आपल्या साड्यांमधून विविध राज्यांच्या कलाकुसरीला प्रोत्साहन देतात. २०२५ च्या अर्थसंकल्पावेळी त्यांनी बिहारच्या प्रसिद्ध ‘मधुबनी’ कलेने सजवलेली ऑफ-व्हाइट सिल्क साडी परिधान केली होती. ती साडी त्यांना पद्मश्री विजेत्या दुलारी देवी यांनी भेट दिली होती, ज्यावर समृद्धीचे प्रतीक म्हणून माशांची नक्षी होती. त्याआधीही त्यांनी ओडिसाची संबलपुरी, इल्कल आणि विविध खादी साड्यांमधून भारतीय वस्त्रोद्योगाचे महत्त्व अधोरेखित केले आहे.
मूळच्या तामिळनाडूच्या मदुराई येथील असलेल्या निर्मला सीतारमण यांचा जन्म १८ ऑगस्ट १९५९ रोजी झाला. त्यांचे प्राथमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण तामिळनाडूमध्येच झाले. त्यांनी तिरुचिरापल्ली येथील सीतालक्ष्मी रामास्वामी महाविद्यालयातून अर्थशास्त्रात पदवी प्राप्त केली. त्यानंतर, दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून (JNU) अर्थशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यांच्या या शैक्षणिक अनुभवाचा आणि गाढ अभ्यासाचा प्रत्यय त्यांच्या अर्थसंकल्पीय मांडणीतून वारंवार येतो.




