Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्याआजपासून राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन

आजपासून राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

राज्य सरकारची गेल्या आठ महिन्यातील अवस्था परिस्थिती बघितली तर राज्याचे मुख्यमंत्री हे महाराष्ट्राच्या अभिमान, स्वाभिमानाचे रक्षण करण्यास असमर्थ आहेत. त्यांच्या सरकारमध्ये महाराष्ट्राच्या हिताचे रक्षण करण्याची ताकद, क्षमता नाही. राज्याबाहेरील शक्तींच्या आदेशाने मुख्यमंत्र्यांचा कारभार चालू आहे, अशी जळजळीत टीका करीत विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सरकारवर केली.

- Advertisement -

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

स्वविचाराने निर्णय घेण्याचा, निर्णयांची अंमलबजावणी करण्याचा कुठलाही अधिकार त्यांना नाही. अशा नामधारी, घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आज चहापानाला बोलवले होते. मात्र, त्यांच्या चहापान कार्यक्रमाला उपस्थित राहणे, हा महाराष्ट्रद्रोह ठरला असता. राज्यातील जनतेच्या इच्छेशी प्रतारणा ठरली असती, असे सांगत पवार यांनी सरकारच्या चहापान कार्यक्रमाला उपस्थित न राहण्याचा निर्णय आम्ही सर्वानुमते घेतल्याचे जाहीर केले. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज, सोमवारपासून सुरुवात होत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रथेप्रमाणे काल संध्याकाळी विरोधी पक्षाला चहापानाचे निमंत्रण दिले होते. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक आज विधानभवनात पार पडली. यावेळी ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, आमदार कपील पाटील, अनिल परब, जितेंद्र आव्हाड, सुनिल प्रभू यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते. बैठकीत अधिवेशनाची रणनीती निश्चित करताना सरकारच्या चहापानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाची माहिती अजित पवार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. यावेळी सरकारवर जोरदार टीका करताना अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांचा उल्लेख घटनाबाह्य मुख्यमंत्री असा केला. शिवाय दिल्लीचे नाव न घेता तेथून येणार्‍या आदेशाने मुख्यमंत्री कारभार करत असल्याचा आरोप पवार यांनी केला.

राज्यात नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना अजुनही नुकसान भरपाई मिळालेली नाही. कृषी उत्पादनांना योग्य भाव मिळत नाही. मातीमोल दराने कृषी उत्पादन विकण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे. राज्यात शेतकर्‍यांच्या आत्महत्याचे सत्र सुरु आहे. लोकप्रतिनिधींवर हल्ले होत आहेत. माजी मुख्यमंत्र्यांवर पाळत ठेवली जात आहे. माजी मंत्र्यांच्या कुटुंबियांना अंडरवर्ल्डच्या मार्फत संपविण्याची खुलेआम भाषा सुरु आहे. इंधनासह जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत., राज्यातील गुंतवणुकीसह रोजगार दुसर्‍या राज्यात जात आहेत. महाराष्ट्राच्या स्वाभिमान आणि हित जपण्यात शिंदे-फडणवीस सरकार सपशेल अपयशी ठरले असून या सरकारची कामगिरी अत्यंत सुमार असल्याचा घणाघात पवार यांनी केला.

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे नाव, चिन्हासंदर्भात दिलेला निर्णय पक्षपाती असल्याची जनभावना आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतरंच आयोगाचा निर्णय देणे योग्य ठरले असते. निवडणुक आयोगाच्या निर्णयानंतर, लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. आज, मनसेचे एकमेव आमदार आहेत. उद्या त्यांनी पक्ष सोडला, बंड म्हणा, उठाव म्हणा, तो केला तर अख्खा मनसे पक्ष आणि रेल्वे इंजिन हे निवडणूक चिन्ह हे त्या आमदारांच्या नावावर होऊ शकते. छोट्या-मोठ्या कुठल्याही पक्षाबाबत हे घडू शकते, अशी भीती व्यक्त करत पवार यांनी त्यामुळे निवडणूक आयोगासारख्या संस्थांनी जबाबदारीने निर्णय दिला पाहिजे. त्यासाठी त्यांची स्वायत्तता टिकली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना सोडल्यापासून त्यांच्याविरोधात, राज्यात जनभावना तीव्र आहे. निवडणुक आयोगाच्या निर्णयानंतर लोकभावना अधिक संतप्त आहेत. आज होत असलेल्या कसबा आणि चिंचवडच्या मतमोजणीनंतर ते दिसेलच. आगामी महापालिका, लोकसभा, विधानसभा निवडणुकीत शिंदे आणि त्यांच्या आमदारांना असलेल्या जागा टिकवणे कठीण जाणार आहे, असे भाकीत पवार यांनी वर्तवले.

मुख्यमंत्र्यांची कामगिरी सुमार

महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळणे हा राजकीय, सामाजिक जीवनात काम करणार्‍या कार्यकर्त्याचा सर्वात मोठा गौरव असतो. मात्र, गेल्या आठ-नऊ महिन्यातील मुख्यमंत्री आणि त्यांच्या सरकारची कामगिरी अत्यंत सुमार आणि महाराष्ट्राला मान खाली घालायला लावणारी आहे, अशी खंत पवार यांनी व्यक्त केली.

महाविकास आघाडी उध्दव ठाकरे यांचे सोबत

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा विश्वासघात करुन तुम्ही मराठी माणसांचा अभिमानबिंदू असलेली शिवसेना फोडली. त्याचा राग जनतेच्या मनात आहे. गेल्या आठ महिन्यात मुख्यमंत्र्यांनी ज्या वेगाने निष्ठा बदलली, त्याचा राग शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनात आहे. महाराष्ट्राची अस्मिता, मराठी माणसांच्या हक्कासाठी लढणार्‍या शिवसेना पक्षासमोरील आव्हानाच्या काळात महाविकास आघाडीतील आम्ही सर्व घटकपक्ष उद्धव ठाकरे आणि शिवसैनिकांसोबत भक्कमपणे उभे आहोत, अशी ग्वाही पवार यांनी दिली.

विरोधक वैफल्यग्रस्त : शिंदे

विरोधकांनी सकारात्मक मुद्दे मांडावेत, त्याच्यावर चर्चा केली जाईल. या अधिवेशनातून आम्ही जनतेच्या प्रश्नांवर भर देऊ. रखडलेल्या योजना आम्ही सुरू केल्या आहेत. अनेक प्रकल्प सुरू केले आहेत. मुंबईतील प्रकल्पांचं काम वेगात सुरू आहे. अधिवेशनात धोरणात्मक निर्णय होतील. विरोधकांनी आज चहापानावर बहिष्कार घातला. त्यांच्यासोबत चहापान टळले हे बरेच झाले. सत्ता गेल्याने विरोधक वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यामुळे आम्ही समजू शकतो. लोकशाहीत बहुमताला महत्व आहे. आमचे सरकार बहुमताचे सरकार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

आरोप करताना त्याला पुरावे पाहिजेत. धमक्या दिल्याचे खोटेनाटे आरोप केले जात आहेत. नारायण राणे यांना जेवत्या ताटावरून उठवले. केतकी चितळेला तुरूंगात टाकले. कंगना रणौतचे घर तोडले. गिरीश महाजन यांना मोक्का लावण्याचा प्रयत्न केला, देवेंद्र फडणवीस यांना तुरूंगात टाकण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु आमच्यावर आता खोटेनाटे आरोप करीत आहेत. आम्हाला लोकांचे प्रेम मिळत आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या पोटात दुखत आहे. ‘वर्षा’ बंगल्यावर लोक भेटायला आल्यानंतर त्यांना चहापाणी द्यायला पाहिजे का नको? ही आपली संस्कृती आहे. परंतु, यावरून अजित पवार आरोप करीत आहेत, असा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला.

लोकायुक्त विधेयक मंजूर करा : फडणवीस

लोकायुक्त विधेयक मंजूर करण्याचा विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रयत्न असेल. सर्व पक्षांनी लोकायुक्ताच्या कायद्याला पाठिंबा द्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. उद्यापासून सुरू होणार्‍या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी फडणवीस यांनी विरोधकांना सहकार्याचे आवाहन केले.

अधिवेशनात लोकहिताचे निर्णय घेतले जातील. विरोधकांनी विधीमंडळात लोकहिताचे मुद्दे मांडवेत. त्यांच्या प्रश्नावर उत्तरे द्यायला आम्ही तयार आहोत, असे फडणवीस यांनी सांगितले. याबरोबरच विरोधी नेत्यांना धमकी देण्यात आल्याच्या तक्रारी झाल्या आहेत. त्याची चौकशी करण्यात येईल. परंतु संजय राऊत सनसनाटी निर्माण करण्यासाठी असे काहीतरी वक्तव्य करतात, असा आरोप फडणवीस यांनी केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या