नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
भारत आणि अमेरिकेमध्ये झालेल्या व्यापार करारावरून आज लोकसभेमध्ये जोरदार गदारोळ झाला. या करारामुळे भारतीय बाजारपेठ ही अमेरिकन कृषी उत्पादनांना खुली होणार असून, त्यामुळे भारतामधील कृषी आणि दुग्ध व्यवसाय संकटात सापडणार असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. तसेच या मुद्द्यावरून आज केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल हे लोकसभेमध्ये निवेदन देत असताना विरोधकांनी मोठ्या प्रमाणावर गोंधळ घातला.
हा गोंधळ सुरु असतानाच या गोंधळातच पीयूष गोयल यांनी अमेरिकेसोबतच्या कराराची माहिती सभागृहाला देण्यास सुरुवात केली. विरोधी पक्षाचे सदस्य घोषणाबाजी करत वेलमध्ये उतरले. त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरु केली. लोकसभाध्यक्षांच्या वारंवार विनंतीनंतरही खासदार जागेवर गेले नाही. यामुळे सुरुवातीला दुपारी १२ आणि नंतर २ वाजेपर्यंत कामकाज स्थगित करण्यात आले. दुसरीकडे निलंबित सदस्यांचे सभागृहाबाहेर आंदोलन सुरु आहे. यावेळी विरोधी पक्षनेते राहुल गांधी देखील आंदोलनात सहभागी झाले होते.
लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर चर्चा सुरु असताना मंगळवारी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जुंपली होती. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी चीन संबंधी माजी लष्कर प्रमुख एम.एम. नरवणे यांच्या पुस्तकाचा हवाला दिला. यावरुन गदारोळ झाला.
गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या टॅरिफ वादानंतर भारत आणि अमेरिकेमधील व्यापार करार मार्गी लागल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले होते. तसेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही याला दुजोरा दिला होता. मात्र या करारामुळे अमेरिकेतील कृषी उत्पादनांना भारतीय बाजारपेठ खुली होणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर आज लोकसभेमध्ये निवेदन देताना पीयूष गोयल यांनी सांगितले की, या व्यापारी कराराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गतवर्षी झालेल्या अमेरिका दौऱ्यानंतर दोन्ही देशांच्या प्रतिनिधींनी सविस्तर चर्चा केला. या करारामधून भारत आपल्या संवेदनशील हितांचे रक्षण करण्यात यशस्वी ठरला आहे.
पीयूष गोयल यांच्या भाषणादरम्यान विरोधी पक्षाच्या खासदारांनी ‘विरोधी पक्षनेत्यांना बोलू द्या’ म्हणून आग्रह धरला. नरेंद्र मोदी – सरेंडर मोदी’, ‘डरता है डरता है नरेंद्र मोदी डरता है’ अशी घोषणाबाजी सुरु केली. विरोधी खासदारांच्या घोषणाबाजीने लोकसभेत एकच गोंधळ झाला. लोकसभाध्यक्ष बिर्ला यांनी विनंती केल्यानंतरही खासदार आपल्या स्थानावर गेले नाही. दुपारी २ पर्यंत कामकाज स्थिगत करण्यात आले.
त्याआधी लोकसभेतून निलंबित करण्यात आलेल्या आठ खासदारांनी संसदेच्या प्रवेशद्वारासमोरील पायऱ्यावर आंदोलन केले. त्यांच्या हातात विविध पोस्टर्स आणि बॅनर होते. त्यावर पंतप्रधान मोदी, माजी आर्मी चीफ एम.एम. नरवणे आणि जेफ्री एपस्टीन यांचे फोटो होते. त्यावर लिहिले होते, ‘पीएम इज कॉम्प्रमाईज्ड’ अर्थात पंतप्रधानांनी हातमिळवणी केली आहे.
Ajit Pawar: विमान अपघाता होण्याआधी अजित पवारांचं कोणाशी झालं संभाषण? समोर आलं रेकॉर्डिंग
दरम्यान, भारत आणि अमेरिका या एकमेकांना पूरक असलेल्या अर्थव्यवस्था आहेत. अमेरिका डेटा आणि ऊर्जा क्षेत्रामधील अग्रेसर देश आहे. तसेच आमच्यासाठी या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करणं अनिवार्य आहे. या करारानंतर अनेक क्षेत्रांमध्ये भारताची निर्यात अमेरिकेपेक्षा अधिक वाढणार आहे. तसेच जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या देशासोबतचा हा करार नवनिर्मितीला गती देईल. हा करार भारताच्या हितामध्ये असून, त्यामधून देशाला खूप लाभ होईल.





