Saturday, July 27, 2024
Homeनगरविजेचा धक्का लागून 9 म्हशींचा मृत्यू; शेतकर्‍यांचे 10 लाखाचे नुकसान

विजेचा धक्का लागून 9 म्हशींचा मृत्यू; शेतकर्‍यांचे 10 लाखाचे नुकसान

भेंडा |वार्ताहर| Bhenda

नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथील ज्ञानदेव दानियल शिरसाठ व शिवाजी ज्ञानदेव शिरसाठ यांच्या 9 म्हशींचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला असून सुमारे 10 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, भेंडा बुद्रुक येथील फुलारी वस्ती परिसरात ज्ञानदेव दानियल शिरसाठ व शिवाजी ज्ञानदेव शिरसाठ यांचे राहते घर व म्हशींचा गोठा आहे. या गोठ्यात त्यांच्या एका ओळीत एकूण 12 म्हशी बांधलेल्या होत्या.

- Advertisement -

बुधवार दि.15 मे रोजी रात्री 8:30 वाजेच्या सुमारास म्हशींना चारा टाकण्यासाठी बांधलेल्या गव्हाणीच्या लोखंडी अँगलमध्ये वीजप्रवाह उतरून ज्ञानदेव दानियल शिरसाठ यांच्या 5 तर शिवाजी ज्ञानदेव शिरसाठ यांच्या 4 अशा एकूण 9 म्हशींचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला असून सुमारे 10 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली. उर्वरित 3 म्हशी बचावल्या आहेत. 9 पैकी 7 गाभण तर 2 दुभत्या होत्या. या घटनेने शिरसाठ कुटुंबियांचे सुमारे 10 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

महसूल, पोलीस विभागाच्या अधिकारी-कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट दिली व घटनेचा पंचनामा केला. फुलारीवस्तीवरून लांडेवाड़ी येथील ग्रामपंचायत मालकीच्या जागेत सदर झालेल्या घटनेतील म्हशींना वाहून नेण्यात आले. त्यासाठी प्रदीप लक्ष्मण फुलारी यांनी जेसीबी व टिपरची मदत केली. मृत म्हशींचे शवविच्छेदन केल्यानंतर ग्रामपंचायत मालकीच्या जागेत त्या पुरण्यात आल्या.

नेवासा पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार) डॉ.तेजस घुले, पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-1 कुकाणा पशुधन विकास अधिकारी डॉ.अमोल गायकवाड व सहाय्यक ज्ञानदेव गरड यांनी मृत म्हशींचे शवविच्छेदन केले. दरम्यान आपदग्रस्त शिरसाठ कुटुंबियांना भेंडा ग्रामस्थाकडून आर्थिक मदतीचा ओघ सुरू झाला आहे.शासनानेही तातडीने मदत करावी, अशी मागणी होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या