अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
नगर तालुका पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या घरफोडीप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत सराईत आरोपीला जेरबंद केले असून त्याच्याकडून सुमारे 31 हजार रुपये किमंतीचे सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. या गुन्ह्यातील आणखी चार आरोपी मात्र पसार असून त्यांचा शोध सुरू आहे.
नगर तालुका पोलीस ठाण्यात 22 ऑगस्ट रोजी जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलीस निरीक्षक किरण कबाडी यांना माहिती मिळाली, या गुन्ह्यातील सराईत आरोपी विकी काळे (वय 30, रा. भोरवाडी, ता.जि.नगर) चास शिवारात साथीदारांसह थांबला आहे. ही माहिती मिळताच सहायक पोलिस निरिक्षक हरीष भोये, अंमलदार रमेश गांगर्डे, दीपक घाटकर, भाऊसाहेब काळे, बाळासाहेब खेडकर, प्रशांत राठोड, महादेव भांड यांच्या पथकाने छापा टाकला. यावेळी विकी काळे हा मिळून आला.
पोलिसांनी चौकशी केली असता त्याने स्वतःसह त्याचे साथीदार सुरेश उर्फ पट्या आण्णा भोसले, मंगेश रामदास काळे (दोघे, रा. पाटोदा, ता. जामखेड), वैभव उर्फ मुक्या किरण भोसले (रा. धानोरा, ता. आष्टी, जि. बीड) व सुशांत सुरेश भोसले (रा. कामरगाव, ता.जि. अहिल्यानगर) या चौघांसह घरफोडी केल्याची कबुली दिली. ताब्यात घेतलेल्या विकी काळे याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून 31 हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले. मात्र त्याचे साथीदार पोलिसांना मिळून आले नाहीत. सध्या विकी काळे याला मुद्देमालासह नगर तालुका पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून पुढील तपास नगर तालुका पोलीस करत आहेत. पसार आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.




