अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
कोतवाली पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने दोन घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये पसार असलेल्या एका संशयित आरोपीला अटक करून त्याच्याकडून एकूण 17 हजार 400 रुपये रोख रक्कम हस्तगत केली आहे. सदर कारवाई पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली, अहिल्यानगर परिसरात एक संशयित इसम फिरत आहे. त्यांनी ही माहिती सहायक पोलीस निरीक्षक योगीता कोकाटे व त्यांच्या पथकास कळविली. या पथकाने शिवम टॉकीज चौक, अहिल्यानगर येथे एक संशयित इसम फिरताना पाहिला. त्याला थांबवून विचारपूस केली असता, तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन कोतवाली पोलीस स्टेशनला आणले.
चौकशीदरम्यान त्याने त्याचे नाव विजय रामप्रसाद गुप्ता (वय 49, रा. लक्ष्मीनगर, डाबकी रोड, गली नं. 5, अकोला) असे सांगितले. त्यानंतर आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक दराडे, अंमलदार रोहिणी दरंदले, विशाल दळवी, संदीप पितळे, दीपक रोहोकले, तानाजी पवार, सुरज कदम, अभय कदम, शिरीष तरटे, दत्तात्रय कोतकर, राम हंडाळ, सचिन लोळगे, सोमनाथ केकाण, महेश पवार, सोमनाथ राऊत, प्रतिभा नागरे यांच्या पथकाने केली.