अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
बालिकाश्रम रस्ता, बोरूडे मळा परिसरात झालेल्या घरफोडीचा गुन्हा अवघ्या 48 तासांत उघडकीस काढत तोफखाना पोलिसांनी संशयित आरोपीला जेरबंद केले आहे. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्या ताब्यातून 1 लाख 10 हजार रूपयांचा सोन्या-चांदीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
दि. 26 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट दरम्यान बोरूडे मळा परिसरातील अमृतकलश अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक 102 मध्ये चोरट्यांनी घरफोडी केली होती. फिर्यादी पवनेश बाळासाहेब चव्हाण हे कुटुंबासह गणेशोत्सवासाठी गावी गेले असता त्यांच्या घराचे कुलूप तोडून 50 हजार रूपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरीस गेले होते. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घरफोड्यांच्या तपासासाठी पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यातील हालचाली व गुन्ह्याची पध्दत लक्षात घेऊन संशयितांविषयी खात्रीशीर माहिती मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी वैभव ऊर्फ मुकेश किरण भोसले (रा. धानोरा, पिंपळखेड शिवार, ता. आष्टी, जि. बीड) याला अकोळनेर परिसरातून सापळा रचून ताब्यात घेतले. पोलिस चौकशीत संशयित आरोपीने तोफखाना पोलीस ठाणे हद्दीत दोन घरफोड्या केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून एका गुन्ह्यातील 40 हजार रूपये किमतीचे 4.550 ग्रॅम वजनाचे सोने व दुसर्या गुन्ह्यातील 70 हजार रूपये किमतीचे 7 ग्रॅम वजनाचे कानातील दागिने असा 1 लाख 10 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याशिवाय, सदर संशयित आरोपी हा एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल दरोड्याच्या गुन्ह्यात पसार असल्याचे उघडकीस आले आहे.
ही कारवाई निरीक्षक कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर, पोलीस अंमलदार सुनील चव्हाण, नितीन उगलमुगले, योगेश चव्हाण, भानुदास खेडकर, सुधीर खाडे, सुरज वाबळे, सुमित गवळी, अविनाश बर्डे, सतीश त्रिभुवन, बाळासाहेब भापसे, भागवत बांगर, दादा रोहोकले, सुजय हिवाळे यांनी केली आहे.




