राहाता |प्रतिनिधी| Rahata
राहाता तालुक्यातील रामपूरवाडी येथे झालेल्या घर फोडीच्या गुन्ह्यातील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून त्याच्याकडून 2 लाख 76 हजार रुपये किंमतीचे 34.5 ग्रॅम वजनाचे सोने हस्तगत केले आहे. 28 मार्च रोजी अनिता संतोष जगताप, रा.रामपूरवाडी, ता.राहाता, जि.अहिल्यानगर यांचे राहते घरामध्ये अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून कपाटामधून सोन्याचे दागीने, मोबाईल घरफोडी करून चोरून नेला. याबाबत राहाता पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक राहाता पोलीस स्टेशन हद्दीमध्ये तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना सदरचा गुन्हा रवि लाल्या भोसले, रा.लक्ष्मीनगर, कोपरगाव, याने त्याचे साथीदारासह केल्याची माहिती मिळाली.
पथकाने मिळालेल्या माहितीवरून लक्ष्मीनगर, कोपरगाव येथे जाऊन शोध घेतला असता रवी लाल्या भोसले हा मिळून आल्याने त्यास ताब्यात घेतले. आरोपीस गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपूस केली असता त्याने सदरचा गुन्हा डोंगर्या शिवराम चव्हाण व सलमानखान शिवराम चव्हाण दोन्ही रा.लक्ष्मीनगर, कोपरगाव, जि.अहिल्यानगर यांचेसह केल्याची माहिती सांगितली. पथकाने आरोपीकडे आणखी कोठे गुन्हे केले आहेत याबाबत विचारपूस केली असता त्याने त्याचे वरील साथीदारासह दोन महिन्यापुर्वी लोणी खुर्द, ता.राहाता येथे रात्रीच्या वेळी घरफोडी केली असल्याची माहिती सांगितली. पथकाने पंचासमक्ष ताब्यातील आरोपी रवी लाल्या भोसले यास गुन्ह्यातील चोरी केलेले सोन्याच्या दागीन्याबाबत विचारपूस केली असता त्याने चोरी केलेले सोन्याचे दागीने हे महेश रविंद्र उदावंत, रा.कोपरगाव, जि.अहिल्यानगर यास विकल्याची माहिती दिली.
पथकाने तपासकामी सोनार महेश रविंद्र उदावंत, रा.कोपरगाव, जि.अहिल्यानगर याने हजर केलेली 2 लाख 76 हजार रुपये किंमतीची 34.5 ग्रॅम वजनाची सोन्याची लगड जप्त केली आहे. आरोपीस गुन्ह्याचे तपासकामी राहाता पोलीस स्टेशन येथे मुद्देमालासह हजर करण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास राहाता पोलीस करीत आहे.