Thursday, November 21, 2024
Homeक्राईमकुटुंबासह गोव्याला जाताच चोरट्यांनी घर फोडले

कुटुंबासह गोव्याला जाताच चोरट्यांनी घर फोडले

रोकड, सोन्या- चांदीच्या दागिन्यांसह साडेचार लाखांचा ऐवज लंपास

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

गोवाला फिरायला जाणे एका व्यावसायिक कुटुंबाला चांगलेच महागात पडले आहे. त्यांचे घर चोरट्यांनी फोडून सुमारे नऊ तोळ्यांचे सोन्याचे दागिने, 550 ग्रॅमचे चांदीचे दागिने, दीड लाख रुपयांची रोकड, मोबाईल असा चार लाख 44 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. सदरची घटना सोमवारी (4 नोव्हेंबर) 1:45 ते 3:15 वाजेच्या दरम्यान केडगाव उपनगरातील भगवाननगरमध्ये घडली आहे.

- Advertisement -

याप्रकरणी गुरूवारी (7 नोव्हेंबर) सायंकाळी कोतवाली पोलीस ठाण्यात दोन अज्ञात चोरट्यांविरूध्द घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यावसायिक योगेश प्रकाश संचेती (वय 44) यांनी फिर्याद दिली आहे. ते नगर- पुणे महामार्गावरील केडगाव शिवारात भगवाननगरमध्ये राहतात. दिवाळी सुट्टी असल्याने संचेती यांचे कुटुंब व नातेवाईक शनिवारी (2 नोव्हेंबर) गोवा येथे फिरण्यासाठी गेले होते. जाताना त्यांनी त्यांचे घर कुलूप लावून बंद केले होते. चोरट्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला. बेडरूममधील कपाटाची उचकापाचक केली. त्यातील दीड लाख रुपयांची रोकड, 25 ग्रॅमच्या सोन्याच्या बांगड्या, 20 ग्रॅमचे कानातील सोन्याचे सहा जोड, 25 ग्रॅमची गळ्यातील सोन्याची चेन, 15 ग्रॅमच्या चार सोन्याच्या अंगठ्या, 2.5 ग्रॅमचे सोन्याचे ब्रेसलेट, 300 ग्रॅमचे चांदीचे ताट, 150 ग्रॅमचे चांदीचे सहा जोड, 100 ग्रॅम चांदीचे 10 कॉईन व एक मोबाईल असा एकुण चार लाख 44 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.

दरम्यान, फिर्यादी हे गुरूवारी गोवा येथून आल्यानंतर त्यांना घरफोडी झाल्याचे लक्ष्यात आले. त्यानंतर त्यांनी कोतवाली पोलिसांना घरफोडीची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक विकास काळे करत आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या