अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahmednagar
भिंगार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जामखेड रस्त्यावरील वैद्य कॉलनी येथील सेवानिवृत्त लष्करी अधिकार्याचा बंगला फोडून चोरांनी सुमारे 4 लाख 60 हजारांचा ऐवज लुटून नेला. ही घटना 21 ते 27 डिसेंबर दरम्यान घडली. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत सेवानिवृत्त लेफ्टनंट कर्नल सर्जेराव शिवाजी नागरे (रा. भाग्योदय कॉलनी, वैद्य कॉलनी जामखेड रोड) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. कर्नल सर्जेराव नागरे 21 ते 27 डिसेंबर दरम्यान कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. तिच संधी साधून चोरांनी बंद घराचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरातील साहित्याची उचकापाचक करून कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम, साड्या असा सुमारे 4 लाख 60 हजारांचा मुद्देमाल चोरून नेला.
30 डिसेंबर रोजी ही घटना घडकीस आली. त्यानंतर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळी सहायक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांनी पथकासह भेट दिली असून, गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे करीत आहेत.
केडगावातही घरफोडी
केडगाव उपनगरातील भूषणनगरमध्ये पाण्याच्या टाकीजवळ घराचा दरवाजा तोडून चोरांनी सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. ही घटना 24 ते 29 डिसेंबर दरम्यान घडली. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत प्रमोद गुलाब जासूद(रा. पाण्याच्या टाकीजवळ भूषणनगर, केडगाव) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. फिर्यादी घटना 24 ते 29 डिसेंबर दरम्यान बाहेरगावी असताना चोरांनी बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील साहित्याची उचकापाचक करून कपाटातील सोन्या-चांदीचे 38 हजारांचे दागिने चोरून नेले, असे फिर्यादीत म्हटले आहे. घटनास्थळी पोलीस निरीक्षक प्रताप दराडे,सहायक पोलीस निरीक्षक विकास काळे यांनी भेट दिली असून, पोलिसांना तपासाच्या सूचना केल्या आहेत.