अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
घराला कुलूप लावून प्रयागराज येथे कुंभ मेळ्यासाठी गेलेल्या व्यावसायिकाचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून सोन्या- चांदीचे दागिने, रोकड असा 60 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला. तपोवन रस्त्यावरील सुखकर्ता अपार्टमेंट येथे रविवारी (23 फेब्रुवारी) सकाळी 9 ते सायंकाळी 5:20 वाजेच्या दरम्यान ही घटना घडली आहे.
याप्रकरणी सुनीलकुमार श्रीपृथ्वीराज वर्मा (वय 36) यांनी बुधवारी (26 फेब्रुवारी) दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनीलकुमार रविवारी सकाळी आपल्या कुटुंबासह प्रयागराज येथे देवदर्शनासाठी गेले होते. घराला कुलूप लावून चावी त्यांनी आपले दाजी रणजितसिंग यांच्याकडे ठेवली होती. त्याच दिवशी सायंकाळी 5:20 च्या सुमारास त्यांच्या लहान भाऊ संजयकुमार यांनी फोन करून घराचे कुलूप व कडीकोयंडा तुटलेला असल्याचे सांगितले. संजयकुमार यांनी घरात जाऊन पाहणी केली असता, बेडरूममधील लोखंडी कपाट उचकटलेले होते आणि घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले होते. कपाटातील दागिने व रोख रक्कम गायब असल्याचे लक्षात येताच त्यांनी तातडीने डायल 112 वर कॉल करून पोलिसांना कळवले. घटनास्थळी पोलिसांनी भेट दिली.
सुनिलकुमार प्रयागराज येथून आल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या घरातून सोन्याचे कानातील टॉप्स, सोन्याची अंगठी, मिनी मंगळसूत्र, चांदीचे पैंजण, चांदीचे दोन कडे, नाकातील मोरणी, सहा हजारांची रोकड असा 60 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.