Saturday, July 27, 2024
Homeनगरघरफोडी करणार्‍या आंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळल्या

घरफोडी करणार्‍या आंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळल्या

तिघांचा समावेश || साडेपाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

घरफोडी करणार्‍या आंतरजिल्हा टोळीला अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. यामध्ये तिघांचा समावेश असून त्यांच्याकडून 74 ग्रॅम सोने व 300 ग्रॅम चांदी असे एकुण पाच लाख 38 हजार 100 रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. किशोर तेजराव वायाळ (वय 42 रा. मेरा, ता. चिखली, जि. बुलढाणा, गोरख रघुनाथ खळेकर (वय 37 रा. शिरसवाडी, ता. जि. जालना), विष्णु हरिश्चंद्र हिंगे (वय 32 रा. चंदनझिरा कॉलनी, जालना, ता. जि. जालना) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. रखमा बालाजी सुंबे (वय 57 रा. बालिकाश्रम रस्ता, नगर) यांचे 25 मे 2024 रोजी अज्ञात चोरट्यांनी घरफोडून 66 हजाराचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले होते. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यासह इतर घरफोडी गुन्ह्यांचा समांतर तपास करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते.

- Advertisement -

पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक समाधान भाटेवाल, पोलीस अंमलदार संदीप पवार, दत्तात्रय गव्हाणे, संतोष लोढे, संदीप दरंदले, संदीप चव्हाण, संतोष खैरे, प्रमोद जाधव, शिवाजी ढाकणे, अमृत आढाव, मयुर गायकवाड, मेघराज कोल्हे, चंद्रकांत कुसळकर यांचे पथक त्यासाठी काम करत होते. पथकाने जिल्ह्यातील घरफोडी झालेल्या ठिकाणी भेटी देऊन घटना ठिकाणचे व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज संकलित करून ते राज्यामध्ये संशयित आरोपींची ओळख पटविणेकामी प्रसारित केले होते. त्यानुसार सदर फुटेजमधील किशोर तेजराव वायाळ (रा. बुलढाणा) याची ओळख पटली होती.

तो सोमवारी (3 जून) साथीदारांसह नगर जिल्ह्यामध्ये पुन्हा चोरी करण्यासाठी आलेला असल्याची माहिती मिळाल्याने पथकाने त्याच्यासह साथीदार खळेकर, हिंगे यांना सावेडी उपनगरातील पाईपलाइन रस्ता ते वडगाव गुप्ता गावाकडे जाणार्‍या रस्त्यावरील नातु बागेजवळून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे गुन्ह्यांचे अनुषंगाने विचारपुस केली असता त्यांनी साथीदार रूद्राक्ष पवार (पुर्ण नाव नाही. रा. लाखनवाडा, ता. खामगाव, जि. बुलढाणा) याच्यासोबत नगर शहर, नेवासा, चाळीसगाव (जि. जळगाव), पैठण (जि. छ. संभाजीनगर) या ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली आहे.

सात गुन्हे उघडकीस
अटकेतील तिघांकडे पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्यांनी नगर जिल्ह्यासह जळगाव व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सात घरफोड्या केल्याची कबूली दिली. यामुळे सात गुन्हे उघडकीस आले आहे. यामध्ये नगर जिल्ह्यातील तोफखाना पोलीस ठाणे हद्दीतील दोन, नेवासा पोलीस ठाणे हद्दीतील तीन, चाळीसगाव (जि. जळगाव) पोलीस ठाणे हद्दीतील एक व पैठण (जि. छत्रपती संभाजीनगर) हद्दीतील एका गुन्ह्याचा समावेश आहे.

तिघे रेकॉर्डवरील गुन्हेगार
किशोर वायाळ हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन त्याच्याविरूध्द जालना, बुलढाणा, अकोला, जळगाव, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये घरफोडीचे एकुण 50 गुन्हे दाखल आहेत. तसेच विष्णु हिंगे याच्याविरूध्द छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यामध्ये फसवणुक, जबरी चोरीचे एकुण सहा गुन्हे दाखल आहेत. गोरख खळेकर याच्याविरूध्द जालना, बीड, छत्रपती संभाजीनगर, नगर जिल्ह्यामध्ये मोक्का, दरोडा, जबरी चोरी, चोरी, फसवणुक व घरफोडीचे एकुण 18 गुन्हे दाखल आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या