Tuesday, May 21, 2024
Homeनगरघरफोड्या करणारी सराईत टोळी गजाआड

घरफोड्या करणारी सराईत टोळी गजाआड

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

पारनेर, बेलवंडी, मिरजगाव व नगर तालुका पोलीस ठाणे हद्दीत घरफोड्या करणार्‍या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सुपा (ता. पारनेर) येथील सोनार गल्लीतून ताब्यात घेत अटक केली आहे. ते चोरीचे सोने विक्री करण्यासाठी आले होते. त्यांच्याकडून दोन लाख 53 हजार रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.

- Advertisement -

शाहरूख आरकस काळे (वय 25 रा. रांजणगाव मशिद ता. पारनेर), राजेश अशोक काळे (वय 20 रा. धाडगेवाडी ता. पारनेर), ऋषी अशोक काळे (वय 20 रा. रांजणगाव मशिद ता. पारनेर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांचा साथीदार राम अशोक काळे (रा. धाडगेवाडी ता. पारनेर) हा पसार झाला आहे. 5 सप्टेंबर रोजी दादासाहेब गंगाराम शेळके (वय 38 रा. उक्कडगाव ता. नगर) यांच्या घराचा दरवाजा फोडून लोखंडी कपाटात ठेवलेले 40 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम व कागदपत्रे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले होते. शेळके यांनी याबाबत नगर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्यासह अन्य घरफोडी, चोरीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू होता. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, अंमलदार बबन मखरे, बापुसाहेब फोलाणे, देवेंद्र शेलार, रवींद्र कर्डिले, रोहित येमुल, सागर ससाणे, अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, बाळासाहेब खेडकर, अमृत आढाव, मेघराज कोल्हे, उमाकांत गावडे यांचे पथक घरफोडी करणार्‍यांचा शोध घेत असताना निरीक्षक आहेर यांना माहिती मिळाली की, शाहरूख काळे हा त्याच्या साथीदारांसह चोरीचे सोने विक्री करण्यासाठी सोनारगल्ली, सुपा येथे येणार आहे.

यानंतर निरीक्षक आहेर यांनी खात्री करून कारवाईचे आदेश दिले. पथकाने सदर ठिकाणी सापळा लावून तीन संशयित इसम पकडले. त्यांच्याकडील सोन्या- चांदीच्या दागिन्यांबाबत चौकशी केली असता त्यांनी पारनेर, बेलवंडी, मिरजगाव व नगर तालुका परिसरात चोरी केलेले सोन्याचे दागिने विक्री करण्यासाठी आलो असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत अटक केली आहे.

चार गुन्हे उघडकीस

तिघांकडे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सखोल व बारकाईने विचारपूस केली असता, त्यांनी त्यांचा साथीदार राम अशोक काळे याच्यासोबत गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. दिलेल्या कबुलीच्या अनुषंगाने जिल्हा गुन्हे अभिलेख पडताळणी केली असता नगर तालुका, मिरजगाव, पारनेर व बेलवंडी पोलीस ठाण्यात दाखल असलेले चार घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. दरम्यान, ते तिघेही सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या