अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
पाथर्डी व शेवगाव तालुक्यात घरफोडी करणार्या टोळीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून 2 लाख 17 हजारांचा मुद्देमला हस्तगत केला. तर, शेवगाव व पाथर्डी पोलीस ठाण्यातील दाखल 9 गुन्हे उघडकीस आणण्यात यश मिळविले आहे. विनोद उर्फ सुप्या सक्या भोसले (वय 25, रा. निपाणी जळगाव, ता.पाथर्डी), सचिन भाऊसाहेब काळे (वय 21, रा.लखमापुरी, ता. शेवगाव) यांना अटक केली तर, सराफ व्यापारी लक्ष्मीकांत सांडुशेठ मुंडलिक (रा.सोनार गल्ली, बिडकीन, ता.पैठण) याला ताब्यात घेतले असून, विकास विठ्ठल भोसले (रा. उमापूर, ता. गेवराई, जि. बीड) हा पसार आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, सुमन बाबुराव पालवे (रा.घाटशिरस, ता.पाथर्डी ) या 25 नोव्हेंबर 2024 रोजी कुटुंबीयासह लग्नाकरिता बाहेरगावी गेल्या असता चोरांनी घराचे कुलूप तोडून घरातील सोन्याचे दागिने चोरून नेले.
याबाबत सुमन पालवे यांच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी सहायक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, उपनिरीक्षक अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार बबन मखरे, हृदय घोडके, फुरकान शेख, शरद बुधवंत, संतोष खैरे, भाऊसाहेब काळे, मेघराज कोल्हे व अरूण मोरे यांच्या पथक नेमूण तपासासाठी रवाना केले. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलीस पथकाला माहिती मिळाली की, वरील गुन्हा विनोद भोसले याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने केला ते सध्या पाथर्डी शहरामध्ये आहेत. पोलीस पथकाने तत्काळ पाथर्डी शहरात जावून विनोद भोसले, सचिन काळे यांन ताब्यात घेतले. त्यांच्या विचारपूस केली असता त्यांनी हा गुन्हा विकास विठ्ठल भोसले याच्या मदतीने केल्याचे सांगितले.
गुन्ह्यातील चोरलेले काही दागिने लक्ष्मीकांत मुंडलिक (रा. सोनार गल्ली, बिडकीन, ता.पैठण)याला विकल्याचे सांगितल्याने त्यास ताब्यात घेण्यात आले. संशयित आरोपींकडे केलेल्या चौकरीत मागील दोन महिन्यात पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील सुमारे 9 घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल झाली. त्यांच्याकडून लपवून ठेवलेले सोन्याचे दागिने एकूण 2 लाख 17 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. संशयित आरोपींना तपासाकामी पाथर्डी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून, पाथर्डी पोलीस अधिक तपास करीत आहेत.