अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
नुकत्याच लग्न झालेल्या महिलेच्या घरी चोरीचा प्रकार समोर आला असून, याप्रकरणी चार संशयितांविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 1 मार्च रोजी सकाळी 10 ते दुपारी साडेतीनच्या दरम्यान नवीन कलेक्टर ऑफीसच्या मागे गॅलक्सी बिल्डींगमध्ये घडली. जिनत बेगम जिशान सय्यद (वय 30) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादीचा विवाह 26 फेब्रुवारी 2025 रोजी झाला आहे. त्या 1 मार्च रोजी सकाळी पतीसमवेत त्यांच्या दुकानावर गेल्या होत्या. दुपारी साडेतीन वाजता त्या घरी परत आल्या असता, इमारतीच्या खाली एक रिक्षा उभी दिसली. त्यात दोन सुटकेसेस व घरगुती भांडी ठेवलेली होती. फिर्यादींनी चौकशी केली असता, खाली उभ्या असलेल्या तबस्सुम खालीद शेख (रा. मुकुंदनगर), हिना जहीर शेख, सना सत्तार पठाण (दोघे रा. झेंडीगेट) व सत्तार अब्दुल पठाण (रा. रामचंद्र खुंट) हे चौघे घाईत रिक्षात बसून निघून गेले.
फिर्यादी घरी पोहोचल्यावर, घराचे कुलूप तोडलेले दिसले. घरात सामानाची उचकापाचक झालेली होती. फिर्यादींनी पाहणी केली असता, दोन हजार रुपयांचे कपडे व सुटकेसेस, लग्नात मिळालेली 11 हजार रुपयांची रोख रक्कम, 10 हजार रुपयांचा मोबाईल आणि पाच हजार रुपयांचे घरगुती भांडे चोरीला गेल्याचे लक्षात आले. एकूण 28 हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला असून, ओळखीच्या चौघांवर चोरीचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. तोफखाना पोलीस ठाण्यात त्या चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.