अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
माळकुप (ता. पारनेर) येथे वृध्द महिलेला धमकावून घरफोडी करणारा चोरटा अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रेकॉर्डवरील गुन्हेगाराला अटक करत 62 हजार 956 रूपये किमतीचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. गणेश रमेश काकडे (वय 30, रा. पेठ आंबेगाव, ता. मंचर, जि. पुणे) असे अटकेतील चोरट्याचे नाव आहे.
हौसाबाई कोंडाजी राहिंज (वय 50, रा. रहिंजवाडी, माळकुप) या 22 नोव्हेंबर रोजी रात्री घरी झोपल्या होत्या. मध्यरात्री दोन अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला आणि त्यांच्या तोंडावर हात ठेवत गप्प रहा, आरडाओरड केली तर जिवे मारू अशी धमकी दिली. काहीतरी धारदार वस्तूचा धाक दाखवत त्यांच्या गळ्यातील दागिने व रोख रक्कम लुटली. याप्रकरणी हौसाबाई राहिंज यांच्या फिर्यादीवरून पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे.
पोलीस निरीक्षक किरण कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक हरिष भोये, पोलीस अंमलदार अतुल लोटके, गणेश लोंढे, फुरकान शेख, सोमनाथ झांबरे, सागर ससाणे, रोहित येमुल, आकाश काळे, बाळासाहेब गुंजाळ, मनोज साखरे, प्रशांत राठोड, चालक अरूण मोरे यांचे पथक या गुन्ह्याचा तपास करत असताना पथकाने तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फूटेज व स्थानिक माहितीच्या आधारे शोध घेत असताना 30 नोव्हेंबर रोजी माहिती मिळाली की रेकॉर्डवरील गुन्हेगार गणेश रमेश काकडे हा नेप्ती नाका परिसरात फिरत आहे.
पथकाने तात्काळ सापळा रचून त्याला शिताफीने ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने माळकुप चोरीत सहभागी असल्याची कबुली दिली. त्याचे साथीदार अक्षय उर्फ सोन्या अर्पण भोसले व गंड्या अर्पण भोसले (दोघेही रा. घाणेगाव, पारनेर) हे पसार आहेत. चौकशीदरम्यान गणेश काकडेने आणखी काही गुन्ह्यांची कबुली दिली. यामध्ये चाकण (पुणे) येथून दुचाकीची चोरी, बनकुटे (ता. पारनेर) येथे साथीदारांसह कुर्हाडीचा धाक दाखवून चोरी, सांगवी सुर्या (ता. पारनेर) येथे कुलूप तोडून दागिने व रोख रक्कम चोरी यांचा समावेश आहे.




