श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
शहराच्या भर बाजारपेठेतील मेन रोडवरील शशिराज सायकलच्या मागील बाजूस असलेल्या सोनार व्यवसायाशी निगडित दुकानामध्ये भरदुपारी दरोड्याचा प्रयत्न झाला. मात्र, दुकानदार आणि स्थानिक नागरिकांच्या दक्षतेमुळे त्यांचा हा प्रयत्न फसला. शहरामध्ये भरदिवसा दरोड्याचा प्रयत्न झाल्याने गुन्हेगारांना कुणाचे भय राहीले आहे की, नाही याबाबत नागरिकांत चर्चा सुरू होती. या घटनेमुळे शहरातील व्यापार्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
शहरातील मेनरोड परिसरातील या दुकानामध्ये दुपारी दोनच्या सुमारास सदर घटना घडली. या दुकानाच्या परिसरामध्ये काही संशयास्पद इसम फिरत असल्याचे स्थानिक नागरिकांच्या लक्षात आले होते. काही वेळातच त्यांनी एका सोनार व्यवसायाशी संबंधित दुकानात प्रवेश करून शस्त्राचा धाक दाखवून दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला.
मात्र, दुकानमालक आणि कर्मचार्यांनी तातडीने त्यांना प्रतिकार करत सतर्कता दाखवली. यावेळी परिसरातील नागरिकांनी आणि दुकानदाराने आरडाओरड केली, त्यामुळे चोरटे गोंधळून गेले. परिस्थिती पाहून आरोपींनी चोरी न करताच घटनास्थळावरून पळ काढला. सदर घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. परिसराची पहाणी करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज त्यांनी तपासले. आरोपींची ओळख पटवण्यासाठी विशेष पथके कार्यरत करण्यात आली असल्याचे समजते. श्रीरामपूर शहराची सुरक्षा व्यवस्था पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे.
मागील आठवड्यामध्ये मोरगेवस्ती परिसरामध्ये काही चोरट्यांनी चाळीस मिनिटातच सहा घरे फोडून मोठ्या प्रमणावर सोेने व रोख रकमेची चोरी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अद्यापह काही तपास लागलेला नाही, तोच परवा संगमनेर रोड परिसरातील गजानन वसाहत परिसरात चोरीच्या उद्देशाने एका घराची भिंत फोडल्याची घटना घडली, आणि काल भर दिवसा एका दुकानामध्ये दरोड्याचा प्रयत्न झाल्याने शहरातील नागरिकांसह व्यावसायिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान काल सायंकाळी उशिरापर्यंत या दरोेड्यांच्या प्रयत्नाबाबत फिर्याद देण्यासाठी फिर्यादी शहर पोलिस ठाण्याकडे फिरकला नाही. त्यामुुळे कोेणत्याही प्रकारच्या गुन्ह्याची नोंद झाली नव्हती.