अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
शेतकर्याच्या शेतातील घरावर दिवसा डल्ला मारून चोरट्यांनी सुमारे नऊ तोळ्याचे सोन्याचे दागिने, 50 भाराचे चांदीचे दागिने व दोन लाख 75 हजाराची रोकड असा पाच लाख 73 हजार 400 रूपयांचा ऐवज दिवसा चोरून नेला. घरफोडी झाली त्यावेळी शेतकरी कुटुंब घराच्या पाठीमागे शेतीमध्ये काम करत होते.
याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्तात्रय आसाराम पवार (वय 57) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना रविवारी (2 जून) सकाळी 11 ते दुपारी साडेबारा वाजेच्या दरम्यान जांब (ता. नगर) शिवारात घडली. पवार कुटुंब जांब शिवारात शेतात राहतात. रविवारी सकाळी 11 वाजता ते घर बंद करून पाठीमागील जवळ असलेल्या शेतात काम करण्यासाठी गेले. त्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या घराचे लॉक तोडून आत प्रवेश केला. घरातील सामानाची उचकापाचक केली.
कपाटाचे लॉक तोडून त्यातील दोन लाख 75 हजाराची रोकड, सोन्याचे गंठण, नेकलेस, अंगठ्या, गोल नथ, गंठण, सर लिंबोळी मणी, झुंबर, रिंगा असे सुमारे नऊ तोळ्याचे दागिने, चांदीचे चाळ, मुलांचे गळ्यातील सर, कडे, पंचपाळ, ब्रासलेट, अंगठी, मासोळी असे सुमारे 50 भाराचे दागिने असा एकुण पाच लाख 73 हजार 400 रूपयांचा ऐवज चोरून नेला. दुपारी साडेबारा वाजता सदरचा प्रकार पवार कुटुंबाच्या लक्ष्यात आला. त्यांनी नगर तालुका पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच नगर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक संपत भोसले, नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते, उपनिरीक्षक मारग यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली. अधिक तपास उपनिरीक्षक मारग करत आहेत.