राजुरी (वार्ताहर) –
राजुरी शिवारात असणार्या पायरेन्स रस्ता जवळून जाणार्या निळवंडे कॅनॉलच्या कडेला असणार्या शेताजवळ काल स
काळी जळालेल्या अवस्थेत बेवारस महिलेचा मृतदेह आढळून आला.
याबाबतची माहिती राजुरीचे पोलीस पाटील रावसाहेब गोरे व राजुरी सोसायटीचे चेअरमन अशोक गोरे यांनी लोणी पोलीस स्टेशनला दिल्यानंतर लोणीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान पाटील व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. यानंतर नगर येथून श्वान पथक व ठसेतज्ञही बोलविण्यात आले होते; परंतु याचा काहीही उपयोग झाला नाही. कारण हा मृतदेह जळालेल्या अवस्थेत होता. यानंतर हा मृतदेह लोणी येथील प्रवरा हॉस्पिटलला शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.
सदरची महिला अंदाजे 20 ते 22 वर्षांची असून हे कृत्य करणारे कोण होते? या महिलेला का मारले व त्यांनी अशाप्रकारे या महिलेला अशा निर्जनस्थळी आणून का टाकले? ही महिला कोण? तिला या ठिकाणीच का आणून टाकले? असे एक ना अनेक प्रश्न सध्या या परिसरातील नागरिकांमध्ये चर्चिले जात आहेत.
या घटनेचा पुढील तपास लोणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान पाटील व त्यांचे सहकारी करीत आहेत.