अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
भरधाव वेगात असलेल्या बसने कंटेनरला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असताना झालेल्या अपघातात बसमधील सात ते आठ प्रवासी जखमी झाले. यातील दोन प्रवासी गंभीर जखमी असून, त्यांच्यावर शहरातील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. केडगावमधील अंबिका बस स्टॉपजवळ रविवारी मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. यात बसच्या चालकाकडील बाजूचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
एसटी महामंडळाची शिवाई बस ही पुण्याच्या दिशेकडून अहिल्यानगरकडे येत असताना केडगाव अंबिका बस स्टॉपजवळ कंटेनरला ओव्हरटेक करत असताना ही धडक झाली. धडक इतकी जोरदार होती की बसचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातात बसमधील सात ते आठ प्रवासी जखमी झाले. यापैकी दोन जणांच्या पायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाल्याची माहिती आहे.
सर्व जखमींना स्थानिकांच्या मदतीने तत्काळ खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर केडगाव परिसरात रस्त्यावर मोठ्या वाहनांची गर्दी झाली. महामार्गावर लांबच लांब रांगा लागल्यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला होता. स्थानिक रहिवाशांनी तत्काळ मदत करत जखमींना बाहेर काढले आणि रूग्णवाहिकेतून जखमींना उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले.




