सारंगखेडा Sarangkheda । वार्ताहर-
शहादा तालुक्यातील सारंगखेडा जवळील माँ सप्तश्रृंगी पेट्रोल पंपाजवळ शहादा-दोंडाईचा रोडवर (Shahada-Dondaicha Road) सकाळी 10 वाजेच्या दरम्यान टायर फुटल्याने ट्रॅक्टर रस्त्यावर उभे होते. त्यावेळी मागावून येणार्या बसने ट्रॅक्टरला (Bus to tractor) जोरात धडक (Hit hard) दिल्यामुळे अपघात (accident) झाला. या अपघातात विद्यार्थ्यांसह 21 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींमध्ये चालक व वाहकाचादेखील समावेश आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, खैरवे मुक्कामी असलेली बस नियमितच्या वेळेनुसार सकाळी 6 वाजता खैरवे येथून शहादाकडे जात असते यात बहुतांशी शाळकरी विद्यार्थी असतात. खास करून शालेय विद्यार्थ्यांसाठी ही बस मुक्कामी असते. इतर प्रवासीदेखील प्रवास करतात. याच दरम्यान बस सारंगखेडा होऊन शहादाकडे जात असताना मॉ सप्तशृंगी पेट्रोल पंपाच्या काही अंतरावर शहाद्याकडे टायर फुटल्याने ऊसाने भरलेला ट्रॅक्टर ट्रॉलीसह उभा होता. याच ट्रॅक्टरला बसने मागावून धडक दिल्याने अपघात झाला. यात विद्यार्थ्यांसह प्रवासी व वाहक चालक असे एकूण 21 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ सारंगखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणण्यात आले.
जखमींवर सारंगखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ.कांतीलाल पावरा, समुदाय आरोग्य अधिकारी राकेश पाटील, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी सी.एम.पाटील, आरोग्य सहाय्यिका, आरोग्य सहाय्यक कर्मचार्यांनी तात्काळ जखमीवर उपचार केले. येथील सरपंच पृथ्वीराजसिंह रावल, पोलीस निरीक्षक राजेश शिरसाठ, पोलीस उपनिरीक्षक भगवान कोळी व सर्व पोलीस कर्मचारी हे घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. त्यांनी जखमींवर तात्काळ उपचार होण्यासाठी सहकार्य केले. आठ विद्यार्थ्यांना उपचार करून घरी सोडण्यात आले, त्याचबरोबर गंभीर दुखापत झालेल्या नऊ विद्यार्थ्यांसह प्रवासी वाहक आणि चालक यांना पुढील उपचारासाठी शहादा येथे पाठविण्यात आले आहे.
अपघाताची वार्ता कळताच टेंभा, सारंगखेडा, कळंबू, कुकावल, देऊर, खैरवे, भडगाव आदी परिसरातील पालकांनी सारंगखेडा प्राथमिक आरोग्य केंद्र गाठले व आपल्या पाल्याची चौकशी केली.
सारंगखेडा ते शहादा या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाल्याने दररोज अपघाताची मालिका सुरू आहे. दुरुस्तीच्या नावावर थातूरमातूर डागडुजी करून लोकांचे अतोनात हाल संबंधित विभागाकडून करण्यात येत आहेत. डिसेंबर महिन्यात या रस्त्याची डागडूजी करण्यात आली होती. मात्र, महिन्याभरातच रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडून रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. यामुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत. नियमित अपघाताची मालिका सुरू असून याला जबाबदार कोण? अशी विचारणा वाहनधारक करीत आहेत.
अपघातात वैष्णवी दरबारसिंग टेंभा, निहारिका आनंदसिंग गिरासे टेंभा, वर्षा विजयसिंग गिरासे टेंभा, प्रेम हिम्मतसिंग गिरासे देऊर, सोनल प्रेमसिंग गिरासे देउर, कल्याणी जितेंद्र गिरासे देऊर, हेमलता आनंदसिंग गिरासे देऊर, डोंगर फकीरा चित्ते टेंबा, नितीन बापू कुवर टेंभा, बस चालक गोरख गोपीचंद पेंढारकर वडाळी, देवेंद्र बंडू पानपाटील वाहक खैरवे, भडगाव, मोहित मुकेश जगताप देऊर, वेदिका नवनाथ कोळी टेंभा, सृष्टी बापू कुवर टेंभा, साक्षी दीपक गिरासे टेंभा, चंद्रकांत रमेश जगताप देऊर, रिया विजय गिरासे टेंभा, वैष्णवी बापुजी कुवर टेंभा, यश किशोर गिरासे देऊर, लोकेश मुकेश जगताप देऊर, जयेश भारत जगताप देऊर हे जखमी झाले आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेश शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली हेकॉ प्रमोद वळवी करीत आहेत. अपघातप्रकरणी जाब जबाब नोंदवून पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.