Sunday, September 8, 2024
Homeनगरखासगी बस प्रवासात डॉक्टरच्या बॅगमधून सहा तोळ्यांचे दागिने लंपास

खासगी बस प्रवासात डॉक्टरच्या बॅगमधून सहा तोळ्यांचे दागिने लंपास

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

खासगी बसमधून प्रवास करत असताना नाशिक जिल्ह्यातील निफाड येथील एका प्रवाशी डॉक्टरच्या बॅगमधून सुमारे सहा तोळे वजनाचे सोन्याचे दागीने अज्ञात भामट्याने चोरून नेल्याची घटना राहुरी तालुक्याच्या हद्दीत घडली आहे. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात अज्ञात भामट्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

सुमेध संजय कुदळे (वय 31) हे व्यवसायाने डॉक्टर असून ते नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात तपोवन रोड येथे राहत आहेत. डॉ. सुमेध कुदळे व त्यांची पत्नी व मुलगा हे नाशिक येथून सोलापूर येथे खासगी कामानिमित्त ट्रॅव्हल्स (एआर 01-9933) मध्ये चालले होते.

सदर बस ही नगर-मनमाड महामार्गावरील एका हॉटेलवर जेवणासाठी थांबली होती. त्यावेळी डॉ. सुमेध कुदळे त्यांच्या पत्नी व मुलासह खाली उतरले. त्यांनी त्यांच्याकडील पावणेसहा तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र व ब्रेसलेट बॅगमध्ये ठेवून बॅग सीटवर ठेवली होती. या दरम्यान अज्ञात भामट्याने डॉ. सुमेध कुदळे यांच्या बॅगमधील 3 लाख 58 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागीने घेऊन पसार झाला. डॉ. सुमेध कुदळे हे सोलापूर येथे गेल्यावर चोरीची घटना त्यांच्या लक्षात आली.त्यानंतर त्यांनी राहुरी पोलीस ठाण्यात हजर राहून फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा रजि. नं. 933/2023 भादंवि कलम 379 प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या