पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi
शहरातील नवीन बस स्थानकातून प्रवासी महिलेच्या गळ्यातून अज्ञात चोरट्याने तीन तोळे सोन्याचे गंठण चोरून नेल्याची घटना आज घडली.तालुक्यात मोठ्या प्रमाणात चोर्यांचे प्रमाण वाढले असून नागरिक हैराण झाले आहेत.
याबाबत विकास पोपट मरकड यांनी तक्रार दाखल केली आहे. मरकड हे त्यांच्या पत्नीसह नवीन बस स्थानकातून पुणे येथे जाण्यासाठी एस.टी.बस मध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी फिर्यादीच्या पत्नीच्या गळ्यातील नव्वद हजार रुपये किमतीचे तीन तोळे वजनाचे सोन्याचे साखळीचे गंठण चोरून नेले.
दरम्यान अशोक लक्ष्मण लांडगे (रा. पागोरी पिंपळगाव, ता. पाथर्डी) या शेतकर्याची पाणी उपसण्याची पाणबुडी मोटार व शेततळ्याचे लोखंडी कंपाउंडचे अँगल चोरून नेल्याची घटना घडली आहे. प्रभू पिंपरी शिवारात लांडगे यांची शेती असून ते 30 ऑक्टोबर रोजी सकाळी शेतात कापूस वेचण्यासाठी गेले असता पाणबुडी मोटार व तार कंपाउंडचे लोखंडी अँगल असा अज्ञात चोरट्याने एकूण सुमारे वीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीस आलेे. याप्रकरणीही पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.