मालेगाव । प्रतिनिधी Malegaon
मुंबई-आग्रा महामार्गावरील परिवहन कार्यालयालगत असलेले किराणा दुकान रात्री बंद करून कारने घरी परतणार्या व्यापार्यावर कांकरिया शोरूमलगत दुचाकीवरून आलेल्या सहा अज्ञात तरुणांनी कारवर प्राणघातक शस्त्रांनी हल्ला करत कारची नासधूस करत 25 लाखाची रोकड असलेल्या पिशव्या घेवून पोबारा केला. रात्रीच्या सुमारास घडलेल्या या लुटीच्या घटनेने व्यापार्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.
या घटनेचे अधिक वृत्त असे की, आनंदनगर भागात वास्तव्यास असलेल्या मनोज चांदमल मुथा (43) यांचे महामार्गावर परिवहन कार्यालयालगत संकेत ट्रेडींग कंपनी हे किराणा दुकान आहे. दुकान बंद करीत शिल्लक रक्कम दोन बॅगेत ठेवून मुथा मारूती कार (एम.एच.-41-ए.एस.-6448) ने घरी परतत असतांना कांकरिया शोरूमलगत गतिरोधकावर त्यांनी कारचा वेग कमी केला असता दुचाकीवरून आलेल्या तिघांनी कट कां मारला अशी कुरापत काढत त्यांच्याशी वाद घातला.
याचवेळी दुसर्या दुचाकीवरून आलेल्या तिघांनी प्राणघातक शस्त्रांनी कारच्या काचा फोडल्या व मागील सीटवर ठेवलेल्या 25 लाखाची रोकड असलेल्या बॅगा घेवून व कारची चावी काढून घेत या सहाही चोरट्यांनी पलायन केले.
या घटनेची माहिती मिळताच अ.पो. अधीक्षक तेगबीरसिंग संधू, उपअधिक्षक सुरज गुंजाळ यांनी घटनास्थळी धाव घेतली. रस्तालूट करणार्या चोरट्यांचा शोध पोलिसांतर्फे घेतला जात आहे.