राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri
राहुरी शहरातील सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेले श्री बुवासिंद बाबा देवस्थानमध्ये काल दि. 27 मार्च रोजी सायंकाळी श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. युवानेते हर्ष तनपुरे व अक्षय कर्डिले यांच्यासह मोठ्या प्रमाणात नाथभक्त उपस्थित होते. राहुरी शहरातील श्री बुवासिंद बाबा देवस्थान येथे दर गुरुवारी नाथ भक्त आरती करत असतात. काल दि. 26 मार्च रोजी दुपारच्या सुमारास श्री बुवासिंद बाबा तालीम येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती. आज दि. 27 मार्च रोजी शहरवासीयांच्यावतीने आठवडे बाजार व बाजारपेठ दिवसभर कडकडीत बंद ठेऊन या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला.
आज गुरुवार असल्याने श्री बुवासिंद बाबा देवस्थान येथे श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग यांच्याहस्ते महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी युवानेते अक्षय कर्डिले व हर्ष तनपुरे यांच्या उपस्थितीत समाधीवर भगवी चादर व पुष्पहार अर्पण करून महाआरती करण्यात आली. आरती झाल्यानंतर नाथ भक्तांनी देवस्थानच्या कळसावर भगवा ध्वज लावण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीस प्रशासनाकडून झेंडा लावण्यास मज्जाव करण्यात आला. त्यामुळे शेकडो नाथ भक्त व पोलीस प्रशासनामध्ये शाब्दिक वाद निर्माण होऊन तणाव निर्माण झाला होता. यावेळी नाथ भक्तांनी दिलेल्या घोषणांमुळे परिसर दणाणून गेला होता. यावेळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता.
दरम्यान, रात्री उशीरा सागर बेग, हर्ष तनपुरे व अक्षय कर्डिले यांची वरिष्ठ पोलीस अधिकार्यांशी चर्चा सुरू होती. त्यावेळी दोन दिवसांत योग्य तो निर्णय घेतला जाईल असे आश्वासन प्रशासनाने दिले. तसेच विटंबना प्रकरणातील आरोपीलाही दोन दिवसांत अटक केली जाईल असा शब्द देण्यात आला. यो दोन्ही ही गोष्टी न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा सागर बेग यांनी दिला आहे.