नवी दिल्ली | New Delhi | वृत्तसंस्था
देशातील चार राज्यातील पाच विधानसभा जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकींचे निकाल आज (सोमवारी ) जाहीर करण्यात आले आहेत. यातील पाचपैकी आम आदमी पक्षाने दोन तर भाजप (BJP) काँग्रेस (Congress) आणि टीएमसीला (TMC) प्रत्येकी एका जागेवर विजय मिळाला आहे. गुजरातमध्ये एक जागेवर भाजपने तर एका जागेवर आम आदमी पक्षाला विजय मिळाला असून काँग्रेसला पुन्हा पराभव स्वीकारावा लागला आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्यानंतर अरविंद केजरीवाल यांचे राजकारण संपणार असे म्हटले जात होते. पण त्यांनी जोरदार पुनरागमन केले आहे. नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत आपने पंजाबमधील लुधियाना पश्चिम विधानसभा मतदारसंघातून विजय मिळविला आहे. या मतदारसंघातून आपचे उमेदवार संजीव अरोरा यांनी काँग्रेसचे भारत भूषण आशु यांचा १० हजार ६३७ मतांनी पराभव केला आहे.
तर गुजरातच्या विसावदर विधानसभा मतदारसंघातून आपचे गोपाल इटालिया विजयी झाले आहेत. त्यांना एकूण ७५ हजार ९४२ मते मिळाली असून त्यांनी भाजपचे किरीट पटेल यांचा
१७ हजार ५५४ मतांनी पराभव केला आहे. तसेच गुजरातच्या कडी सीटवर भाजपचे राजेंद्र चावड़ा ३९ हजार ४५२ मतांनी निवडून आले आहेत. त्यांनी काँग्रेसचे के.रमेश चावड़ा यांचा पराभव केला असून, त्यांना ६० हजार २९० मते मिळाली आहेत.
तसेच केरळमध्ये (Keral) काँग्रेसचे उमेदवार आर्यदान शौकत विजयी झाले आहेत. त्यांनी सीपीआयएमचे (CPIM) एम. स्वराज यांचा पराभव केला. तसेच पश्चिम बंगालमधील कालीगंज मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसच्या उमेदवार अलिफा अहमद यांनी विजय (Won) मिळवला असून, त्यांनी भाजपचे आशिष घोष यांचा पराभव केला.
अरविंद केजरीवाल पुन्हा राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होणार?
आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना पोटनिवडणुकीच्या विजयाबद्दल आणि राज्यसभेत जाण्याबद्दल एक वृत्तसंस्थेने विचारले असता ते म्हणाले की, “राज्यसभेत कोण जाणार हे पक्षाची राजकीय व्यवहार समिती ठरवेल पण मी जाणार नाही”, असे त्यांनी सांगितले. फेब्रुवारीमध्ये दिल्लीतील पराभवानंतर लुधियाना पश्चिम पोटनिवडणुकीत आम आदमी पक्षाच्या विजयामुळे पक्षासाठी एक राजकीय संधी निर्माण झाली आहे. राज्यसभेचे खासदार संजीव अरोरा यांनी आमदार होण्यासाठी राजीनामा दिल्यानंतर, पंजाबमधील वरिष्ठ सभागृहातील एक जागा रिक्त झाली आहे. अरविंद केजरीवाल यांच्या नकारानंतर, आता आम आदमी पक्ष कोणाला राज्यसभेत पाठवतो हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.




