Sunday, October 6, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यसभेच्या दोन जागांसाठी ३ सप्टेंबरला पोटनिवडणूक; निवडणूक आयोगाकडून कार्यक्रम जाहीर

राज्यसभेच्या दोन जागांसाठी ३ सप्टेंबरला पोटनिवडणूक; निवडणूक आयोगाकडून कार्यक्रम जाहीर

पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता

मुंबई | प्रतिनिधी | Mumbai

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले हे सातारामधून तर केंद्रीय मंत्री पियूष गोयल हे उत्तर मुंबई मतदारसंघातून निवडून गेल्याने राज्यसभेच्या दोन जागा रिक्त झाल्या आहेत. या रिक्त जागांसाठी येत्या ३ सप्टेंबरला पोटनिवडणूक (By Election) घेण्यात येणार आहे. भारत निवडणूक आयोगाने (Election Commission of India) बुधवारी महाराष्ट्रातील राज्यसभेच्या दोन जागांसह एकूण १२ जागांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला.

- Advertisement -

हे देखील वाचा : Cabinet Meeting : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले ‘हे’ मोठे निर्णय

आयोगाने घोषित केलेल्या कार्यक्रमानुसार १४ ऑगस्ट २०२४ रोजी पोटनिवडणुकीची अधिसूचना जारी केली जाईल. इच्छुक उमेदवारांना २१ ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. २२ ऑगस्टला उमेदवारी अर्जांची छाननी केली जाईल तर २६ ऑगस्ट ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. त्यानंतर आवश्यकता भासल्यास ३ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत मतदान घेण्यात येईल. त्यानंतर पाच वाजता मतमोजणी (Vote Counting) होऊन निकाल घोषित केला जाईल.

हे देखील वाचा : राज ठाकरेंनी तिसरा उमेदवार केला जाहीर; थेट माजी मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवाविरुध्द ठोकला शड्डू

महायुतीत (Mahayuti) राज्यसभेच्या (Rajyasabha) दोन जागांपैकी भाजप आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकी एक जागा लढविणार आहे. राज्यसभेच्या दोन जागा निवडून आणण्याइतके संख्याबळ महायुतीकडे आहे. त्यामुळे ही पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, राष्ट्रवादीकडून सातारा जिल्ह्यातील नेते नितीन पाटील यांना उमेदवारी दिली जाणार आहे. लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांनी पाटील यांचे नाव जाहीर केले होते. तर भाजपकडून (BJP) विनोद तावडे यांच्या नावाची चर्चा आहे. या पोटनिवडणुकीमुळे राज्यसभेतील अजित पवार गटाच्या सदस्यांची संख्या तीनवर पोहचणार आहे.  

हे देखील वाचा : उध्दव ठाकरेंचा मोदी-शहांना सल्ला; ‘मोदी-शहांनी बांगलादेशात जावे’

दरम्यान, उदयनराजे भोसले यांची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला दिली जाणार आहे. त्यामुळे पोटनिवडणुकीत निवडून जाणाऱ्या उमेदवाराला राज्यसभेत जवळपास पावणेदोन वर्षाचा कालावधी मिळेल. भोसले यांच्या जागेची मुदत २ एप्रिल २०२६ रोजी संपणार आहे. तर पियूष गोयल यांच्या रिक्त जागेची मुदत ४ जुलै २०२८ पर्यंत आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या