Tuesday, May 7, 2024
Homeअग्रलेखमूल्यांची घसरण ही खरी समस्या!

मूल्यांची घसरण ही खरी समस्या!

चोरी करणे भयंकर गुन्हा आहे, फार मोठे पाप आहे, हे ऐकतच माणसे मोठी होतात. चोरी करायची नसते हे त्यांच्या मनावर लहानपणापासूनच बिंबवले जाते. या आशयाच्या अनेक कथा घरातील लहानग्यांना ऐकवल्या जातात. चोरांना कशी शिक्षा केली जाते हेही त्यांना वेळोवेळी सांगितले जाते. तात्पर्य, मुलांनी चोरी करू नये हा मूल्यसंस्कार त्यांच्यावर केला जातो. तथापि काळाच्या ओघात हे मूल्य मागे पडले असावे का? चोरी करणे गुन्हा म्हणण्याऐवजी तीच सवय चांगली मानली जात असावी का? लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांना विविध सुविधा पुरवल्या जातात. उशा, ब्लँकेट, टॉवेल, बेडशीट अशा अनेक वस्तूंचा त्यात समावेश असतो. गेल्या वर्षभरात पुणे विभागात लोकांनी २० लाखांपेक्षा जास्त किमतीचे साहित्य चोरून नेले आहे.

प्रवासीही ते सामान त्यांचेच समजून घरी घेऊन जातात. माध्यमात त्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. अनेकदा चालत्या रेल्वेगाडीतून प्रवाशांचे सामान चोरीला जाते. अशा प्रवाशांना रेल्वे नुकसानभरपाई देते. असा नियम असल्याचे सांगितले जाते. मग रेल्वेचे सामान चोरीला गेले तर रेल्वेला कोणी भरपाई द्यावी? सार्वजनिक मालमत्तेकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन हा कळीचा मुद्दा आहे. सार्वजनिक मालमत्ता ही नागरिकांची मालमत्ता आहे, याचा लोकांना विसर पडला असावा. समाजात अनेकदा छोट्या मोठ्या घटना घडतात ज्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येते. असे झाले की, पहिला हल्ला होतो तो सार्वजनिक मालमत्तेवर! लोक बसगाड्या जाळतात. सरकारी कार्यालयांमध्ये तोडफोड करतात. दगडफेक करतात. रेल्वेच्या डब्यांना आग लावतात. पथदीप फोडतात. ते चोरून नेतात. सार्वजनिक मालमत्ता उभारणीत जनतेने दिलेल्या कररुपी पैशांचादेखील मोठा वाटा असतो. त्यांचे नुकसान झाले की, त्यांची दुरुस्तीदेखील जनतेच्या पैशांतून केली जाते. म्हणजे सार्वजनिक मालमत्तेची चोरी करून, नुकसान करून लोक त्यांच्याच पायावर धोंडा पडतात याची जाणीव कधी होणार? कितीही संताप आला तरी लोक त्यांच्या घरात तोडफोड आणि वस्तूंची फेकाफेक करतात का? जाळतात का? मग रस्त्यावरच हे कसे घडते? रेल्वेच्या वस्तू ज्यांच्याकडे आढळतील अशा प्रवाशांवर कारवाई केली जाईल, असा इशारा पुणे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिला. असे इशारे चोरीला आळा घालू शकतील का? एका प्रकरणात कलम ३५३ अंतर्गत सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणारांना शिक्षा ठोठावली गेली होती, पण म्हणून तसे घडणे थांबले का? नियम किंवा कायदेशीर कलम हाच फक्त यावरच उपाय ठरू शकेल का? फक्त कायदा प्रश्न सोडवू शकत नाही हे याआधीही अनेकदा समाजाने अनुभवले आहे. मूल्यांची घसरण ही खरी समस्या आहे. चोरी करू नये, मोठ्यांना आदर द्यावा, नम्र असावे, शिक्षण घ्यावे, सर्वांविषयी आपुलकी असावी, रस्त्यात थुंकू नये, पाणी जपून वापरावे, रांगेचा फायदा सर्वाना, अन्न वाया घालवू नये अशा अनेक सामाजिक मूल्यांना लोक तिलांजली देताना आढळतात. कायदे आणि नियम हवेत, पण त्या बरोबरीने मूल्यांची रुजवण पुन्हा एकदा व्हायला हवी. त्याची सांगड फक्त शाळेतील एका तासापूर्ती घालणे पुरेसे ठरणार नाही. ती अमलात कशी आणली जातील याचे नवनवे मार्ग शोधले जायला हवेत. त्यासाठी समाजधुरीण, जाणते आणि सुजाण पालकांनी पुढाकार घ्यायला हवा.

- Advertisment -

ताज्या बातम्या