Wednesday, December 4, 2024
Homeनगरठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर

ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर

मुंबई – ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आणखी लांबणीवर पडणार आहे. नागपूर येथील हिवाळी अधिवेशन संपताच राज्य मंत्रिमंडळाचा रखडलेला विस्तार केला जाणार अशी चर्चा होती. येत्या 24 तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे सांगितले जात होते. मात्र, मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय आता दिल्लीत होणार असल्याचे समजते. काँग्रेसमध्ये मंत्रिपदासाठी जोरदार लॉबिंग सुरू असल्याने मंत्र्यांची यादी ठरण्यास विलंब लागत आहे. त्यामुळेच विस्ताराचा मुहूर्त लांबला आहे. काँग्रेसची यादी ठरल्यानंतरच विस्तार केला जाणार आहे.

त्यासाठी मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात सोमवारी दिल्लीला जाणार असून विस्ताराबाबत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींशी चर्चा करणार आहेत. या चर्चेनंतरच काँग्रेसमधील भावी मंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल. मंत्रिमंडळ स्थापनेवेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येकी दोन मंत्र्यांना शपथ देण्यात आली. 28 नोव्हेंबरला शिवतीर्थावर ठाकरे सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला होता. मात्र, यानंतर 24 दिवस उलटूनही मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही.

- Advertisement -

उद्धव ठाकरे यांनी सहा मंत्र्यांना घेऊन हिवाळी अधिवेशन पार पाडले. मात्र, सरकार स्थापन झाल्यानंतरही राज्याचा कारभार ठप्पच आहे. येत्या 24 तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, काँग्रेसमध्ये मंत्रिपदाची नावे आणि खात्यांसाठीही लॉबिंग सुरू आहे. अनेक नेत्यांनी दिल्ली दरबारी मंत्रिपदासाठी प्रयत्न चालविले असल्याने काँग्रेसची यादी लांबली आहे.

प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना महसूल मंत्रिपद कायम ठेवण्यात येणार आहे. मात्र या दोन बड्या नेत्यांना कोणती खाती द्यायची यावर खलबते सुरू आहेत. शिवाय माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि नितीन राऊत यांनाही महत्वाची खाती हवी आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील आमदार के. सी. पाडवी यांचीही वर्णी पक्की आहे. महिला व बालविकास खाते हे काँग्रेसकडे आहे. या खात्यावर माजी मंत्री वर्षा गायकवाड यांच्याबरोबरच विदर्भातील आमदार यशोमती ठाकूर यांचेही नाव चर्चेत असल्याचे समजते. पश्चिम महाराष्ट्रातही मंत्रिपदासाठी जोरदार लॉबिंग सुरु आहे. खाती कमी आणि इच्छुक जास्त झाल्याने काँग्रेसची यादी ठरण्यास विलंब लागत आहे. त्यामुळे 24 तारखेचा मुहूर्त लांबणीवर पडला आहे.

राजशिष्टाचारानुसार विधानसभा अध्यक्ष, विधानपरिषद सभापती, उपसभापती, दोन्ही सभागृहतिल आमदार, मुंबईतील खासदार, महापौर आदींना शपथविधीचे निमंत्रण पाठवले जाते. या निमंत्रण वाटपासाठी किमान दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागतो. आता नुकतेच विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपले आहे. यामुळे आमदार आप-आपल्या मतदारसंघात गेले आहेत.

त्यामुळे शपथविधीसाठी तत्काळ त्यांना मुंबईला येणे शक्य नाही. तसेच मुख्यमंत्री कार्यालय, राजशिष्टाचार आणि सामान्य प्रशासन विभागानेही आतापर्यंत राजभवनवर विस्तार किंवा मंत्रिमंडळ शपथविधिबाबत काहीही माहिती दिली नाही. त्यामुळे मंगळवारी (24 डिसेेंबर) शपथविधी नसल्याचे समजते. दरम्यान मंत्रिमंडळ विस्तार झालेला नसल्यामुळे अनेक महत्त्वाचे निर्णय प्रलंबित असल्याची टीका विरोधकांकडून करण्यात आली होती.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या