Monday, June 24, 2024
Homeनगरश्रीरामपूर तालुक्यात केबल चोरांचा सुळसुळाट

श्रीरामपूर तालुक्यात केबल चोरांचा सुळसुळाट

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

- Advertisement -

गेल्या अनेक दिवसांपासून श्रीरामपूर तालुक्यात केबल, इलेक्ट्रिक मोटार, विजपंप आदी शेती साहित्याच्या चोर्‍यांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. या प्रकारामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. प्रत्येक चोरीचा श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल होतो. परंतु तपास मात्र लागत नाही. या प्रकारामुळे श्रीरामपूर तालुका पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे. आगोदरच अडचणीत असलेला शेतकरी या चोर्‍यांमुळे अधिकच संकटात सापडला आहे. त्यामुळे वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी तालुक्यातील चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होऊ लागली आहे. अन्यथा मोठे जनआंदोलन उभे राहील, असा इशाराही शेतकर्‍यांनी दिला आहे.

मागील काही महिन्यांपासून तालुक्यात केबल व वीज पंप चोरांचा सुळसुळाट झाला आहे. प्रारंभी भोकर, खोकर, माळवाडगाव, मुठेवाडगाव, उंदिरगाव, हरेगाव, बेलापूर, ऐनतपूर आदी भागांमध्ये अनेक शेतकर्‍यांच्या शेतातून केबल, वीज पंप (पाणबुडी) चोरीस जाण्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच महावितरण कंपनीचे अनेक रोहीत्रही या चोरट्यांनी लंपास केले आहेत. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र अद्याप एकाही गुन्ह्यांचा उलगडा झालेला नाही.

मागील आठवड्यात पढेगाव, मालुंजा रोड भागात तसेच प्रवरा नदी परिसरात अनेक ठिकाणी अशाप्रकारे केबल चोरीच्या घटना घडल्या आहेत. पढेगावचे विद्यमान सरपंच किशोर बनकर यांची सुमारे 2200 फूट केबल चोरट्यांनी चोरून नेली. त्यानंतर शनिवारी येथीलच कृष्णा फर्निचरचे मालक श्री. झगडे यांच्याही शेतातून लाखो रुपयांची केबल चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी त्यांनी तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे.

तसेच तालुक्यातील उंदीरगाव येथील अशोक मच्छिंद्र गलांडे यांच्या शेतातून 100 फूट केबल भल्या पहाटे चोरट्यांनी चोरून नेली.अशोक गलांडे हे सतत चोर्‍या होत असल्याने आपल्या मळ्यात मुक्कामी होते. रविवारी सकाळी 6 वाजता उठल्यावर विहिरीतील मोटार केबल पाहिल्या. त्यावेळी सर्व जागेवर व्यवस्थित होते. परंतु त्यानंतर सकाळी 7 वाजता त्यांची मुले शेतावर गेले असता दोन्ही मोटरच्या केबल चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. पाळत ठेवून सकाळी 6 ते 7 वाजेदरम्यान अशी चोरीची घटना घडली. अनेक वेळा पोलीस विभागाला माहिती देऊन देखील तपास लागत नाही. अनेक चोर्‍या झाल्या व सतत चोर्‍या होत आहेत.पोलिसांची गस्त वाढविण्याची गरज आहे. तक्रारी देऊनही पोलीस विभाग गांभीर्याने घेत नसल्याने येथील शेतकरी, नागरिक हैराण झाले आहेत. त्यात पहाटे 6 वाजता चोरी होणे हे एक मोठे आश्चर्य आहे. त्यामुळे तालुका पोलीस वरिष्ठांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने पहाण्याची गरज आहे. ग्रामीण भागात गस्त वाढवून या केबल चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामीण भागातील शेतकर्‍यांनी व ग्रामस्थांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या