अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
शहरातील बालिकाश्रम रस्त्यावर अश्लिल चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून देणार्या ‘गोल्डन कॅफे’वर तोफखाना पोलिसांनी पुन्हा छापा टाकून कारवाई केली. कॅफेचा मालक ओंकार कैलास ताठे (वय 24, रा. ताठे मळा, पंपिंग स्टेशन रस्ता, बालिकाश्रम रस्ता, अहिल्यानगर) याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, याच गोल्डन कॅफेवर तोफखाना पोलिसांनी मागील महिन्यात 26 एप्रिल रोजी छापा टाकून कारवाई केली होती. तसेच यापूर्वी जुलै 2024 व नोव्हेंबर 2024 मध्ये देखील कारवाई करण्यात आली होती. तो पुन्हा पुन्हा कॉलेजच्या तरुण- तरुणींना अश्लिल चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून देत असल्याचे समोर आले आहे. पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील व पोलीस अंमलदार यांनी रविवारी (11 मे) गोल्डन कॅफेवर छापा टाकला.
छाप्यादरम्यान कॅफेमधील फर्निचरच्या कंपार्टमेंटच्या आडोशाला काही तरुण-तरुणी अश्लिल चाळ्यांमध्ये गुंतलेले आढळून आले. पोलिसांनी कारवाई करत कॅफेचा मालक ओंकार ताठे विरोधात गुन्हा नोंदवला आहे. दरम्यान, ओंकार ताठे हा वारंवार तरुण- तरुणींना अश्लिल चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून देत असल्याचे पोलिसांनी केलेल्या कारवाईतून समोर आले आहे. त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.