अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार फेर्यांच्या निमित्ताने उद्भवणार्या तणावपूर्ण घटनांना आळा घालण्यासाठी प्रत्येक प्रचार फेरीचे पोलिसांकडून स्वतंत्रपणे व्हिडिओ चित्रीकरण करण्याचे आदेश नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी दिले आहेत. निवडणूक यंत्रणेमार्फत प्रचारफेरीचे चित्रीकरण होत असले तरी त्याशिवाय पोलिसांकडूनही स्वतंत्र नोंद ठेवली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे मंगळवारपासून अहिल्यानगर जिल्हा दौर्यावर असून त्यांनी जिल्हा पोलीस दलाची वार्षिक तपासणी सुरू केली आहे. बुधवारी (7 जानेवारी) त्यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारी परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी निवडणूक काळातील पोलीस व्यवस्थेबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली. कराळे यांनी पोलिसांना आचारसंहितेचा भंग होणार नाही याची विशेष दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या. निवडणूक संदर्भातील प्रत्येक तक्रार, तसेच अदखलपात्र गुन्ह्यांची तातडीने दखल घ्यावी, घटनास्थळी त्वरित भेट देऊन पाहणी करावी, तसेच शहरातील विविध भागांत रूट मार्चचे आयोजन करून पोलीस सतर्क असल्याचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवावा, असे निर्देश त्यांनी दिले.
निवडणूक प्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून जिल्ह्यात उपलब्ध असलेले पोलीस बळ पुरेसे असल्याने बाहेरून अतिरिक्त पोलीस मागवण्याची आवश्यकता भासणार नसल्याचे कराळे यांनी सांगितले. यासोबतच गृहरक्षक दलाचे 900 जवान आणि राज्य राखीव दलाच्या सहा तुकड्या तैनात करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. गुन्हेगारी प्रवृत्तीवर कडक नियंत्रण ठेवण्याचा इशारा देताना त्यांनी सांगितले की, ज्या गुन्हेगारांवर यापूर्वी दोन गुन्हे दाखल आहेत, अशा व्यक्तींवर निवडणूक काळात आणखी एक जरी गुन्हा दाखल झाला तरी त्यांचा जामीन तसेच बाँड (प्रतिज्ञापत्र) रद्द करण्यात येईल.
गस्तीपथकांची संख्या वाढवण्यात आली असून जिल्हा पोलीस दलात नुकतीच दाखल झालेली 28 वाहने गस्तीसाठी वापरण्यात येणार आहेत. प्रत्येक रस्त्यावरून दर दहा मिनिटांनी गस्ती पथक जाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासोबतच रात्रीच्या गस्तीमध्येही वाढ करण्यात आली आहे.
सोशल मीडियांवरील प्रचारावर लक्ष
सोशल मीडियांवरील प्रक्षोभक व चिथावणीखोर पोस्टवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण आले असल्याचे सांगताना कराळे यांनी पोलिसांच्या सायबर शाखेच्या कार्याचे कौतुक केले. महापालिका निवडणूक काळात सोशलमीडियांवरील प्रचारावरही बारकाईने लक्ष ठेवले जात असून कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचवणार्या पोस्टवर तात्काळ कारवाई केली जाईल, असा इशाराही कराळे यांनी दिला.




