Sunday, November 24, 2024
Homeअग्रलेखबदलातील सातत्य आणि स्थिरता एसटी टिकवू शकेल? 

बदलातील सातत्य आणि स्थिरता एसटी टिकवू शकेल? 

आधुनिक तंत्रज्ञानाने लोकांचे जगणे सहज आणि सुकर केले. हा बदल हेरून व्यावसायिक जगताने एका क्लिकवर अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत माणसाला लागणारी प्रत्येक गोष्ट काही मिनिटात त्याच्या घराच्या दाराशी येऊन हजर होऊ शकते. एसटीनेही आता हा बदल स्वीकारायचे ठरवले असावे.

महामंडळाने एसटीचे अँप तयार केले असून पुढच्या महिन्यात ते प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिले जाईल असे एसटीच्या व्यवस्थापकीय संचालकांनी माध्यमांना सांगितले. या अँप मध्ये प्रवाशांचा प्रवास सुकर होऊ शकेल अशा अनेक गोष्टींचा समावेश असेल. वाढत्या संपन्नतेबरोबर पर्यटन वाढले. प्रवासाची आरामदायी साधने लोकांना हवीहवीशी वाटू लागली. अनेक सेवा सशुल्क असतात. तथापि पर्यटनाच्या सुखासीनतेसाठी खिशाला खार लावायची मानसिकता तयार झाली. पर्यटन काळाबरोबर बदलत चालले असले तरी ग्रामीण भागाच्या विकासाची जीवनरेखा मानली जाणारी एसटी मात्र या स्पर्धेत काहीशी मागे पडल्याची प्रवाशांची भावना आहे. वेळोवेळी ती व्यक्तही केली जाते.

- Advertisement -

स्वच्छ बसेस, आरामदायी बैठक, हवेशीर खिडक्या, वातानुकूलित बसेस, एका क्लिकवर आरक्षण, नियमितता, वक्तशीरपणा अशा अनेक स्तरावर एसटीमध्ये बदल प्रवाशांना अपेक्षित असावा. तथापि काही बाबतीत तरी प्रवाशांच्या पदरी  निराशा पडत असावी का? स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियान हे त्याचे नमुनेदार उदाहरण ठरावे. अभियानाची पहिली फेरी पार पडली आहे. हे अभियान शासकीय आहे. पहिल्या फेरीचे जाहीर झालेले निष्कर्ष फारसे आशादायक नाहीत. राज्यात ५७७ पेक्षा जास्त बसस्थानके आहेत. त्यापैकी ३९४ बसस्थानकाची अवस्था अतिशय वाईट असल्याचे वृत्त माध्यमात प्रसिद्ध झाले आहे. अर्थात सगळेच चित्र तसे नाही. काही प्रमाणात एसटीच्या कारभाऱ्यांना बदलाची जाणीव झाली असावी.

रोख पैसे नसतानाही एसटीतून प्रवास, एसटीचे ट्विटर हॅन्डल, नाशिकहून पुण्याला जाण्यासाठी सतत बसेस, सीएनजी वर चालणाऱ्या बसेस, महिलांना तिकीट दरात पन्नास टक्के सवलत, ऑनलाईन तिकीट आरक्षण अशा अनेक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरु आहे. पण कोणताही बदल करणे सोपे असते. त्यात सातत्य राखणे हेच मोठे आव्हान ठरू शकते. एसटी करत असलेले बदल प्रवाशांच्या अनुभवास येणे, त्यांच्या पसंतीस उतरणे जितके आवश्यक आहे तितकेच ते बदल काळाबरोबर टिकणे जास्त गरजेचे आहेत. अन्यथा अभियानाच्या काळात स्थानके चकाचक आणि अभियान संपले कि पहिले पाढे पंचावन्न, असे प्रत्येक बाबतीत होणे चालू शकेल का? वाढत्या स्पर्धेच्या काळातही एसटीची सेवा टिकावी अशी भावना सामान्य माणसे व्यक्त करतात.

एखाद्या गावात पहिल्यांदा एसटी पोहोचली तर लोक ढोल ताशे लावून तिचे स्वागत करतात. एसटीची वाट बघतात. एसटीविषयी लोकांना वाटणारी आपुलकी हे एसटीचे बलस्थान ठरावे. ते बलस्थान बळकट होण्यासाठी एसटीने काळाबरोबर नुसती कात टाकणे पुरेसे ठरू शकेल का? बदलातील सातत्य आणि त्यातील स्थिरताही तितकीच महत्वाची ठरू शकेल.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या