Monday, May 20, 2024
Homeअग्रलेखकर्करोग रुग्णांना दिलासा मिळावा 

कर्करोग रुग्णांना दिलासा मिळावा 

कॅन्सर रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना दिलासा मिळू शकेल असे वृत्त माध्यमात नुकतेच प्रसिद्ध झाले. राज्य सरकार राज्याच्या ग्रामीण रुग्णालयात कर्करोग निदान सुविधा उपलब्ध करून देणार आहे. त्यासाठी आशियाई विकास आणि आशियाई पायाभूत सुविधा बँकांचे सुमारे दोनशे कोटींचे अर्थसहाय्य मिळणार असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी माध्यमांना सांगितले.

दुसरे वृत्त असे. मुंबईच्या टाटा रुग्णालयात लाखो कॅन्सर रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात. त्यांना व त्यांच्या नातेवाईकांना आर्थिक आणि इतर समस्यांना सामोरे जावे लागते. कॅन्सर रुग्णांना त्यांच्या परिसरात उपचारांची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी टाटा रुग्णालयाने राज्यातील नवी मुंबई, पंजाबमधील मुल्लानपूर आणि विशाखापट्टणम येथे अत्याधुनिक यंत्रणांनी सज्ज कँन्सर उपचार केंद्र उभारण्याचा निर्णय जाहीर केला आहे. रुग्णाची डोळ्यात तेल घालून काळजी घेणे (क्लोजर द केअर गॅप) या आशयाची यंदाच्या कर्करोग दिवसाची संकल्पना आहे. उपरोक्त निर्णय अंमलात येतील तेव्हा कदाचित या संकल्पनेला बळकटी मिळेल म्हणजेच संबंधित सर्वाना दिलासाही मिळू शकेल. रुग्णाची काळजी घेताना त्यांच्या नातेवाईकांना देखील विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. निदान, महागडे उपचार, उपचारांची सुविधा, त्यातील अत्याधुनिकता, संबंधितांची निवास आणि भोजन व्यवस्था या त्यापॆकीच काही. कर्करोगाचे अनेक प्रकार असतात.

- Advertisement -

प्राथमिक अवस्थेत निदान झाले तर त्यातील कितीतरी प्रकारचे कॅन्सर बरे होतात असे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. समाजांत जागरूकता निर्माण करण्यासाठी ती माहिती उपयोगात आणली जाते. तथापि   कर्करोग हा नुसता शब्द देखील ऐकला तरी सामान्य माणसे अस्वस्थ होतात. मृत्यूचे सावट जाणवल्याची भावना निर्माण होते. मग ज्यांना त्याचे निदान होते त्यांची मनोवस्था किती कोलमडून पडत असेल याची कल्पना येऊ शकते. निदान झाल्याचे समजताच माणसे मनाने खचतात. आयुष्याचा शेवट जवळ आल्याची भावना त्यांच्या मनात निर्माण होते. बचतीचे आकडे त्यांच्या डोळ्यासमोर फेर धरतात आणि मग ज्याची आर्थिक परिस्थिती बेताची असते असे तर लढण्याआधीच हार मानतात. खर्चिक उपचार ही मुख्य अडचण असते. अचूक निदानासाठी देखील खर्च करण्याची अनेकांची परिस्थिती नसते. त्यामुळे लक्षणे जाणवत असली तरी माणसे त्याकडे दुर्लक्ष करतात. होता होईल तेवढे दुखणे अंगावर काढण्याचा प्रयत्न करतात. पण जसजसा कर्करोगाचा फैलाव वाढतो तसा त्यांचा आणि नातेवाईकांचा निरुपाय होतो.

उपरोक्त शासकीय निर्णय कठोरपणे अमलात आला तर ही उणीव दूर होऊ शकले. रुग्ण रुग्णालयात दाखल झाल्यास त्याची सगळी सोय होते. प्रश्न त्यांच्याबरोबर असलेल्या नातेवाईकांचा असतो. त्यांची राहण्याची आणि खाण्याची सोय नसते त्यांची तर अधिकच आबाळ होते. अनेकांना जंक फूडकर दिवस काढावे लागतात. मुंबईतील परिस्थिती अधिकच बिकट असू शकते. अनेक सामाजिक संस्था या क्षेत्रात स्वयंस्फूर्त काम करतात. तथापि व्याधी वेगाने फैलावत आहे. भारतात प्रत्येकी नऊ व्यक्तींपैकी एकाला कर्करोग होणाचा धोका असल्याचा निष्कर्ष इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्च आणि नॅशनल सेंटर फॉर डिसीज अँड इंफेरमॅटिक्स या संस्थांच्या संशोधनार नमूद आहे. २०२२ मध्ये देशात सुमारे १५ लाख व्यक्तींना कर्करोग झाला होता अशी माहिती आरोग्य आणि कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी लोकसभेत एका प्रश्नाचे उत्तर देताना दिली. रुग्णाच्या गाव परिसरात निदान आणि उपचारांची सुविधा उपलब्ध होऊ शकल्या तर यांचा फार मोठा ताण आणि भार हलका होऊ शकेल. 

- Advertisment -

ताज्या बातम्या