श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
अंमली पदार्थांच्या अवैध विक्रीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर आणि श्रीरामपूर शहर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत वॉर्ड क्रमांक 2 येथून गांजासह (Cannabis) एका आरोपीला अटक (Accused Arrested) केली. या कारवाईत 604.84 ग्रॅम गांजा, रोख रक्कम, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा असा एकूण 17 हजार 621 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या विक्रीवर आळा घालण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थविरोधी पथक श्रीरामपूर शहर परिसरात माहिती संकलन करत असताना गुप्त बातमीदारामार्फत कुरेशी मोहल्ला, वॉर्ड क्रमांक 2 येथील इरफान छोटू शेख (वय 40) हा राहत्या घरी गांजा (Cannabis) विक्रीसाठी साठवून ठेवत असल्याची माहिती मिळाली.
माहितीची खातरजमा करून स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याशी समन्वय साधत पोलीस निरीक्षक विशाल खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्त पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला. झडतीदरम्यान आरोपीच्या (Accused) ताब्यातून प्लास्टिकच्या पिशवीत ठेवलेला 604.84 ग्रॅम गांजा, 2 हजार रुपये रोख, तसेच इलेक्ट्रॉनिक वजनकाटा जप्त करण्यात आला. प्राथमिक चौकशीत जप्त केलेला गांजा फकिर (पूर्ण नाव उपलब्ध नाही), रा. बजरंग चौक, वार्ड क्र. 2, श्रीरामपूर याच्याकडून आणल्याची माहिती आरोपीने दिली असून संबंधित संशयित फरार आहे. त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी रमीजराजा रफीक आतार यांच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात (Shrirampur City Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध गुंगीकारक औषधिद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ (एनडीपीएस) अधिनियम, 1985 अंतर्गत कलम 8 (क) व 20(ब)(ळळ)(अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर आणि श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने केली. पोलिसांच्या या कारवाईमुळे श्रीरामपूर शहरातील अंमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधातील मोहिमेला आणखी बळ मिळाले आहे.




