Wednesday, January 7, 2026
Homeक्राईमगांजा, नशेची इंजेक्शन्स…तरूणाई ड्रग्जच्या गर्तेत!

गांजा, नशेची इंजेक्शन्स…तरूणाई ड्रग्जच्या गर्तेत!

जिल्हा पोलिसांची आव्हानात्मक मोहीम सुरू

अहिल्यानगर | सचिन दसपुते| Ahilyanagar

अंमली पदार्थ विक्रीतून मोठ्या प्रमाणावर पैसा मिळत असल्याने अनेक अवैध धंदा करणारे व्यावसायिक या मार्गाकडे वळले आहेत. गांजा, नशेचे इंजेक्शन अशा अंमली पदार्थांची विक्री अहिल्यानगर जिल्ह्यात वाढत असून ही चिंतेची बाब ठरत आहे. अंमली पदार्थ विक्री रोखण्यासाठी शासनाने विशेष मोहिम हाती घेतली असून जिल्हा पोलिसांनीही अंमली पदार्थ विक्रीविरोधात कठोर कारवाई सुरू केली आहे. श्रीरामपूर, संगमनेर, अहिल्यानगर शहर आदी ठिकाणी अंमली पदार्थ सहज उपलब्ध होत असून तरूण पिढी त्याच्या आहारी गेली आहे.

- Advertisement -

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी ‘ड्रग्ज फ्री’ पोलीस ठाणे करण्याचा मानस व्यक्त केला असून, त्यादृष्टीने सर्व पोलीस ठाणेदारांना सूचना दिल्या आहेत. घार्गे यांच्या संकल्पनेतून ‘नगरकरांनो, आता तुम्हीच सांगा आम्ही कसे आहोत’ या अभिनव उपक्रमाव्दारे क्यूआर कोडच्या माध्यमातून नागरिकांचे अभिप्राय मागविण्यात आले. या अभिप्रायांमध्ये सर्वाधिक प्रतिक्रिया अंमली पदार्थ संदर्भातील आल्या आहेत. नागरिकांनी सांगितले की, अंमली पदार्थांची विक्री कुठे आणि कशा पध्दतीने चालते, मुले त्याच्या आहारी कशी जात आहेत, याबाबत गंभीर चिंता आहे. पोलिसांकडून गांजा विक्री करणार्‍यांवर नेहमीच कारवाई केली जाते, मात्र अलिकडच्या काळात श्रीरामपूर शहरासह नगर शहरात नशेच्या इंजेक्शनचे प्रमाण वाढले आहे.

YouTube video player

जिमला जाणार्‍या तरूणांना ताकद वाढवण्यासाठी आणि नशेसाठी मेफेन्टरमाइन इंजेक्शन परवाना नसताना विकले जात असल्याचे आढळून आले आहे. दिल्ली येथून कुरिअरव्दारे हे इंजेक्शन मागवले जाते आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याची विक्री केली जाते. अनेक तरूण या व्यसनाच्या आहारी गेले आहेत. यापूर्वी श्रीरामपूर पोलिसांनी कारवाई करून तब्बल 14 कोटी रूपयांची ड्रग्जसदृश पावडर जप्त केली होती. गांजाची मोठ्या प्रमाणात विक्री सुरू असून अनेक वेळा पोलिसांनी त्याचा साठा पकडला आहे. कोतवाली पोलिसांनी सुमारे 100 किलो गांजा जप्त केल्यानंतर दोन दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 120 किलो गांजा जप्त केला.

दोन्ही कारवाईत पकडलेला गांजा ओडीसातून येत असल्याचे समोर आले आहे. गेल्या आठ महिन्यात पोलिसांनी सुमारे 1100 किलो गांजा पकडला आहे. अनेक छोट्या टपर्‍यांवर गांजा सहज उपलब्ध आहे. गांजाच्या नशेमुळे तरूण गुन्हेगारी कृत्याकडे वळत असून नशेच्या अवस्थेत स्वतःचे भान हरवतात. तरूण पिढी बरबाद करण्यासाठी गांजा आणि इंजेक्शनसारख्या नशेचा वापर वाढत असल्याचे स्पष्ट होते. जिल्ह्यातील 2,074 नागरिकांनी पोलिसांविषयी मत नोंदवताना अंमली पदार्थ हा प्रमुख मुद्दा मांडला. गांजाच्या नशेत असलेल्या तरूणांकडून महिलांची छेड काढली जाण्याचा धोका असल्याचे काही तरूणींनी सांगितले.

सर्वात धक्कादायक प्रतिक्रिया बेलवंडी पोलीस ठाणे हद्दीतून आली असून, तेथे चरससदृश पावडर प्रति ग्रॅम 2,500 रूपयांना विकली जात असल्याचे नागरिकांनी निदर्शनास आणले. श्रीगोंदा तालुक्यातील ढवळगाव, देवदैठण, अरणगाव परिसरात या पावडरचे मोठे रॅकेट सुरू असल्याचेही उघड झाले. ड्रग्जमुळे विद्यार्थ्यांची निर्णयक्षमता कमी होते आणि ते इतर गुन्ह्यांकडे वळतात. हुक्का पार्लरवर कारवाई करावी, तसेच सोशल मीडियावर ड्रग्जचे उदात्तीकरण करणार्‍या पेजेस व प्रोफाइल्सवर बंदी घालावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. अंमली पदार्थांच्या वापरामुळे होणार्‍या दुरवस्थेविषयी पोलीस काही ठोस उपाय करत नाहीत, अशी खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, शासनाने अंमली पदार्थविरोधी मोहिम सुरू केली असून मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ड्रग्जविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. ड्रग्ज विक्री रॅकेटमध्ये पोलिसांचा सहभाग आढळल्यास संबंधितांना तत्काळ बडतर्फ करण्याचे आदेशही दिले आहेत. अधीक्षक घार्गे यांनीही ही मोहीम व्यापक करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. एकंदरीत, जिल्ह्यातील वाढता ड्रग्जचा वापर पाहता पोलिसांनी अधिक कठोर आणि तातडीची कारवाई करणे आवश्यक असून, नागरिकांना सुरक्षित आणि निरोगी वातावरण मिळावे यासाठी ड्रग्ज फ्री जिल्हा हा संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्याची गरज आहे.

शिर्डी परिसरात व्हाईटनर नशा
शिर्डी परिसरातील गुन्हेगारी अलिकडच्या काळात चर्चेत आली आहे. मंदिर परिसरात गांजा ओढणारे, पाकीटमार, अल्पवयीन मुले व मुली व्हाईटनरसारखी नशा करत असल्याची माहिती फीडबॅकमध्ये नागरिकांनी दिली आहे. दरम्यान, शाळा-महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी व्हाईटनर व्यसनाच्या आहारी गेले आहेत. व्हाईटनरसोबत एनर्जी ड्रिंक्स पिण्याचीही सवय विद्यार्थ्यांमध्ये वाढली आहे, जी आगामी पिढीसाठी धोकादायक ठरू शकते. शाळा- महाविद्यालय परिसरात मावा, गुटखा सहज मिळत असल्याचे ही चिंतेची बाब आहे.

सोशल मीडियावरून व्यवहार
गांजा, इंजेक्शन आदींची विक्री सोशल मीडियाव्दारे सुरू असून ठराविक कोडवर्ड भाषेत व्यवहार होतो. विक्रीचे ठिकाण निश्चित नसते; ऑनलाईन संपर्कातून व्यवहार ठरवून ठराविक जागी माल पोहोचवला जातो. नेहमीचा ओळखीचा ग्राहक असेल तर त्याची विक्री केली जाते. त्यामुळे कारवाई करण्यात पोलिसांना मर्यादा येता. सोशल मीडियावर नियंत्रण ठेवून अंमली पदार्थ विक्री रोखणे हे पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरत आहे.

ताज्या बातम्या

Nashik Municipal Corporation Election : “फक्त एक मत मला द्या, उरलेली...

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik आगामी महापालिका निवडणुकीच्या (Mahapalika Election) पार्श्वभूमीवर नवीन नाशकात (Nashik) प्रचाराला वेग आला असतानाच, काही इच्छुक उमेदवारांनी (Candidate) निवडलेली...